मुंबई - भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कुबड्यावर होता. आमची कुबडी आणि आमची शिडी घेऊन भाजपा महाराष्ट्रात वाढली. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बिणीनं भाजपाला शोधावं लागलं असतं. संघाच्या शाखेवर २ माणसं उभी असायची. राज्यात भाजपाचा विस्तार शिवसेनेमुळे झाला. ही शिडी भाजपानं विसरणं म्हणजेच कृतघ्नपणा आहे असा टोला शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे.(Shivsena MP Arvind Sawant Target BJP Ashish Shelar)
सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना कथित धमकी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाची अवस्था म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी झाली आहे. सत्तेत येण्यासाठी शिवसेनेची बदनामी केली जातेय. बेळगावचा प्रश्न जिवंत राहिला तो शिवसेनेमुळेच. १०६ हुतात्मे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी दिले. बेळगावसह महाराष्ट्रासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर पोरकटपणे बोलू नये. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात माजी मुख्यमंत्री प्रचाराला बेळगावात गेले होते. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आशिष शेलार यांना विकृती नव्हे तर विकार झाला आहे असा टोला अरविंद सांवत यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.
त्याचसोबत कोरोनासंदर्भात केंद्र सरकारचे वाभाडे जगभरात निघत आहेत. उरलेसुरले कालच्या निवडणूक निकालात गेले आहेत. देशात क्रांती घडत आहे. महाराष्ट्राने क्रांती घडवण्याला सुरुवात केली. गुडघ्याला बाशिंग बांधू नये. पंढरपूरचा निकालानंतर राज्य सरकारवर संक्रमण येणार असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही मोठ्या राज्यात तुमचा पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने पहिला राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर आमच्या सरकारवर बोला असंही अरविंद सावंत यांनी भाजपाला बजावलं आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
पंढरपूर निकालावर भाष्य करताना आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. जे स्वत: कुबड्यांवर आहेत आणि ज्यांचे पहिले पाऊलचं कुबड्यांशिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकात नाही असा टोला शेलारांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांना लगावला होता.