ठाणे - मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्वत: पालकमंत्री शिंदे यांनी जाधव यांना फार महत्त्व न देण्याची भूमिका घेतली असली तरी शिवसैनिक आणि पदाधिकारी मात्र आता पेटून उठले आहेत. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी जाधव यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत, एका रात्रीत आणि केवळ व्हिडओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, असा टोला लगावला आहे. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मागील काही दिवसापासून ठाण्यात शिवसेना विरुध्द मनसे असा वाद उफाळून आला आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील झाली होती. परंतु ही अटक होत असतांना त्यांनी वसंत डावखरे, गणेश नाईक आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ही मंडळी आता संपली असल्याची टिका केली होती. त्यानंतर शहरात शिवसेना विरुध्द मनसे असा बॅनवर वॉरही रंगला होता. हे बॅनरवार रंगत असतांनाच आता शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी देखील यात उडी घेतली असून जाधव यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. परंतु असे कोणी कोणाच्या सांगण्यावर संपत नसतो. प्रत्येक जण कतृत्वाने मोठो होत असतो असा टोला त्यांनी जाधव यांना लगावला. डावखरे यांनी देखील किती वर्ष काम केले आहे, त्यातूनच ते आमदार आणि सभापती झाले. पालकमंत्री शिंदे हे देखील हे एक शाखा प्रमुख होते, पुढे नगरसेवक, सभागृह नेता, आमदार झाले. त्यानंतर मंत्री पालकमंत्री, विरोधी पक्ष नेता झाले एवढी सर्व पदे मागील 25 ते 30 वर्षे ते ठाणो शहरात काम करीत आहेत. कार्यकर्ता असाच घडत नसतो, सकाळी व्हिडीओ करायचा टिका करायची आणि सोडून द्यायची अशी टिकाही त्यांनी केली.
या महामारीच्या काळात, डॉक्टर किंवा इतर मंडळी शिंदे हे देखील स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड हॉस्पिटलमध्येही जात होते. परंतु आपण केवळ त्या कंपाऊंड वॉलच्या बाहेरुन बाईट देत होतो, असेही सुनावले. आज टिका करणे फार सोपे आहे, परंतु अशा परिस्थितीत, सर्वानी एकत्र येऊ न काम करणो गरजेचे असतांनासुध्दा, अशा पध्दतीने टिका केल्या आणि तुम्ही कोणाला धमकी देत आहात, ठाणे जिल्हा हा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालेलो आहोत, त्यामुळे धमकी आम्हाला देऊ नका असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते हे काही एक दिवसात किंवा एक व्हिडीओ बाईट देऊन घडलेलो नाही. आम्ही आज कशाचीही पर्वा न करता दिवस रात्र काम करीत आहोत. ठाणे जिल्ह्यातही शासनाची मदत येईल मग आम्ही मदत करु अशी भावना न ठेवता आम्ही आधीपासूनच या कोरोनाच्या संकट काळात मदत सुरु केली होती. अन्न धान्य वाटले, अरसेनिक अल्बमच्या गोळ्या वाटल्या, पण तुम्ही काय काम केले ते तरी सांगा असा सवालही त्यांनी जाधव यांना केला. केवळ टिका करण्याशिवाय तुम्हा काय केले, या आव्हानाच्या गोष्टी तुम्ही आमच्या सारख्यांना सांगूनका अजूनही आमच्यातील शिवसैनिक जागा आहे. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी आमचे शिवसेनेचे जे पद आहे, तो शिवसैनिक असतो. घरातून उचलून नेन्याची धमकी आम्हाला देऊ नका आम्ही काय लहान मुल नाही, तुम्ही तुमच्या औकातीत रहा आणि निमुटपणे पक्षाचे काम करा, चांगली कामे असतील आम्ही सहकार्य करु परंतु अशी टिका, आव्हान देणार असाल तर आमच्या नादी सुध्दा लागू नका असा इशाराही त्यांनी दिला.