मुंबई: वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवसेनेनं अनुल्लेखानं मारलं आहे. यावर मी काय बोलणार. आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. लाड यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं असताना त्यांनी थोड्याच वेळात सारवासारव सुरू केली. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असं म्हणत लाड यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील दादरमध्ये काल भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी लाड यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं. 'आता आपण माहिममध्ये आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,' असं लाड म्हणाले. याबद्दल राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता, हा शाखाप्रमुख पातळीवरचा विषय आहे. त्याला शाखाप्रमुखच उत्तर देतील, असं खोचक प्रत्युत्तर राऊत यांनी दिलं.
नितेश राणेंची घणाघाती टीका; राऊतांचा प्रतिहल्लामुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी जोरदार टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी याच कार्यक्रमात केली. त्यावर काही लोक गांजा ओढून बोलतात असं मी कुठेतरी ऐकलं आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.