मुंबई : डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. या विधानावरून भाजपा आक्रमक झाली आहे. संजय राऊत यांचे असे विधान कोरोना योद्ध्यांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.
शनिवारी संजय राऊत यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत यांच्या या विधानावरून भाजपा आक्रमक झाली आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असे विधान करणे म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यातीलच नव्हे देशातील सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात रुग्णांचा आकडा तब्बल 25 लाखांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (15 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65,002 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 996 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25,26,193 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,036 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,68,220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18,08,937 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.