मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत कंगनानं मुंबई महापालिका अधिकारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिवादी केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करुन कंगना राणौतला फटकारलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढायला कुणी थांबवू शकत नाही, एका अभिनेत्रीने मुंबई हायकोर्टात महापालिकेने अवैध बांधकाम पाडले त्याविरोधात याचिका दाखल केली आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यात राज्यसभा खासदार संजय राऊत यांनाही पक्षकार करण्याची मागणी केली आहे. बाबरी खटल्यापासून मराठी अस्मितेबाबत अनेक खटल्यांना सामोरे गेलो आहे. त्यामुळे अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी रोखू शकत नाही असं राऊत म्हणाले आहेत.
कंगना राणौतनं मुंबईतील तिच्या अनाधिकृत कार्यालयावर बीएमसीने तोडक कारवाई केल्याने हायकोर्टात गेली आहे. याठिकाणी तिने ज्या अधिकाऱ्याने कार्यालय तोडलं त्या महापालिका अधिकाऱ्यांना आणि खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मागितली, अभिनेत्रीने केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मुंबई हायकोर्टाने यासाठी परवानगी दिली आहे.
कंगनानं ९ सप्टेंबर रोजी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यात तिने पाली हिल येथील तिच्या घरातील एका भागात बीएमसीने तोडक कारवाई केली,ती चुकीची असल्याचं म्हटलं आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या या कारवाईमुळे माझं प्रचंड नुकसान झालं असून तिने कोर्टात २ कोटी नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. कोर्टात कंगनाचे वकील बीरेंद्र सराफ यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून कंगनाला मिळालेली धमकीचा हवाला देण्यात आला.
या सुनावणीत न्या. काठवाला म्हणाले की, जर अभिनेत्रीने अशाप्रकारे डीवीडी कोर्टाला दिली आहे, जर ती खरी निघाली तर संजय राऊत यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. म्हणून कोर्टाने संजय राऊत यांना या प्रकरणात प्रतिवादी बनवलं आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.
मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली होती कंगना?
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर उघडपणे बोलणा-या कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे वक्तव्य केले होते. ‘मला गुंड, माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटू लागलीय. मुंबईत मला हिमाचल प्रदेश किंवा थेट केंद्र सरकारची सुरक्षा हवी़ मुंबई पोलिसांची नको,’असे ट्विट तिने केले होते.
मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे ट्विट केल्यानंतर कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने यानंतर दिला होता. एवढेच नाही तर कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते़ अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्षपणे तिच्या चुकीची जाणीव करून दिली होती.
संजय राऊत यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले होते. यावर कंगनाने एक ट्विट करत, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती़ ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. याआधी मुबंईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्याआणि आता उघडपणे धमक्या मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’असे ट्विट कंगनाने केले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
प्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर…
शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता
काय सांगता! सामान्य मुलीच्या बँक खात्यात तब्बल १० कोटी आले अन् तिनं थेट पोलीस स्टेशन गाठले
सूर्यग्रहणाशी डोळे भिडवलेल्या महिलेने सुदृढ कन्येस दिला जन्म; अंधश्रद्धेचे ग्रहण कायमचं सुटलं
लग्न करा अन् मिळवा साडेचार लाख रुपये; ‘या’ देशाच्या सरकारचा अनोखा निर्णय
होऊ दे चर्चा! डॅशिंग तिची अदा, चाहते झाले फिदा; TMC खासदार मिमी चक्रवर्तीचे व्हायरल फोटो पाहा