काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला सेना-राष्ट्रवादी युतीचा उतारा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:15 AM2021-06-18T08:15:13+5:302021-06-18T08:15:57+5:30
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभेची निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढेल, असे विधान केल्यानंतर आता शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणुका लढविण्याचे सुतोवाच केले आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रात गुरुवारी याबाबतचे भाष्य करण्यात आले आहे. ‘स्वबळावर लढून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करणे यात चुकीचे काय? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहिले दोनच पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी. सगळेच स्वबळावर लढणार असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल’ असे या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सूतोवाच आधीच केले असल्याची पुस्तीही त्यात जोडली आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वबळावर लढण्याचे पटोले यांनी सूतोवाच करणे यात गैर काहीही नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. भाजप सत्तेत येणे हे देशाच्या, राज्याच्या हिताचे नाही या भूमिकेतून तीन पक्ष एकत्र आले. आम्ही योग्यवेळी योग्य तो निर्णय घेऊ.
तिघांनी अधिक संघटितपणे काम
करावे - जयंत पाटील
n राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्तेतील तिन्ही पक्षांनी एकत्र राहावे याला सर्वांनीच प्राधान्य दिले पाहिजे.
n त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील असे मत शिवसेनेच्या मुखपत्रात व्यक्त केले आहे.
n राज्यातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते. प्रत्येक पक्षाचे बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे.