विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. ही जागा काँग्रेसचीच होती, त्यांचाच अध्यक्ष होणार, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. तसेच त्यांचा कोण उमेदवार असेल हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. (Sanjay Raut clear about Speaker of the Assembly election candidate row.)
महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असे त्यांनी म्हटले. मराठा समाजाविषयी आस्था असेल तर पंतप्रधान लक्ष घालतील. आता केंद्र सरकारनेच यातून मार्ग काढावा, असे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस शहांना जाऊन भेटले, त्यात चर्चा करण्यासारखे काय. मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह भेटले होते. त्यावेळीही वेगळी चर्चा रंगली होती, असे राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल, असे राऊत यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची शिवसेनेची मागणी असल्यावर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार शिवसेना ठरवत नाही, शिवसेनेचा असेल तर उद्धव ठाकरे ठरवतील. सोनिया गांधींशी ठाकरेंचे चांगले संबंध आहेत. कोणता प्रसंग उभा ठाकल्यास ते एकमेकांशी चर्चा करतात, असे ते म्हणाले.