मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं आणि त्यानंतर थेट शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, राज्याच्या राजकारणात झालेली ही उलथापालथ सगळ्यांसाठीच मोठा धक्का होती, एकमेकांचे कट्टर विरोधक मित्र बनले. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले.
शिवसेनेच्या या राजकीय खेळीनंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. राज्यातील सत्तासंघर्षाला १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, शिवसेना आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढतच आहे. मात्र यातच भाजपा नेत्याने बंददाराआड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय की, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा कायमचा शत्रू नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजपा यांची २५ वर्षांची युती तुटली होती, पण अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो असं ते म्हणाले.
त्याचसोबत भविष्यात काही होईल हे आगामी काळात ठरेल. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली कारण त्यांना माहिती आहे सोनिया गांधी या प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन आहेत. पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ते सोनिया गांधी यांच्या दबावाखाली येणार नाहीत असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील वने आणि वीजबिलांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, मुनगंटीवारांनी जे काही सांगितले ते योग्य आहेच, शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमचं महाविकास आघाडीचं सरकार मागील १ वर्षापासून यशस्वीरित्या कामकाज करत आहे, हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पार पाडेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.