काँग्रेसला वगळून होणाऱ्या आघाडीला शिवसेनेचा विरोध; वैचारिक मतभेद असले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:22 AM2021-12-05T06:22:42+5:302021-12-05T06:23:25+5:30

‘तीन तिघाडा, काम बिघाडा कशाला?’ काँग्रेस काही राज्यांमध्ये सत्तेत तर आहेच, शिवाय बऱ्याच राज्यांमध्ये या पक्षाचा चांगला प्रभाव आहे.

Shiv Sena opposes alliance excluding Congress; says its will benefits to BJP | काँग्रेसला वगळून होणाऱ्या आघाडीला शिवसेनेचा विरोध; वैचारिक मतभेद असले तरी...

काँग्रेसला वगळून होणाऱ्या आघाडीला शिवसेनेचा विरोध; वैचारिक मतभेद असले तरी...

Next

मुंबई : काँग्रेसला वगळून एक वेगळी आघाडी निर्माण केली गेली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल, अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी शनिवारी मांडली. वैचारिक मतभेद असले तरी एकत्र येता येणे शक्य आहे, हे महाविकास आघाडीच्या पॅटर्नने देशाला दाखविले आहे, असेही ते म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन ‘यूपीए आता आहेच कुठे?’, असा सवाल करीत काँग्रेसला डिवचले होते आणि काँग्रेस किंवा यूपीएशिवाय भाजपला नवा पर्याय देण्याचे संकेतही दिले होते. त्यावरून सध्या वादळ उठले असताना राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेस काही राज्यांमध्ये सत्तेत तर आहेच, शिवाय बऱ्याच राज्यांमध्ये या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. शिवसेना यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणाचीही सदस्य नाही, पण भाजपला सक्षम पर्याय द्यायचा असेल तर एकास एकच दिला पाहिजे. भाजपविरोधी दोन आघाड्या झाल्या तर त्याचा फायदा भाजपलाच होईल, हे स्पष्ट आहे.

तीन तिघाडा, काम बिघाडा कशाला? त्यातून ‘तुला ना मला घाल कुत्र्याला, असे होईल. भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व काँग्रेस सक्षमपणे करू शकत नाही, असे ममता बॅनर्जी यांना वाटते. त्यांचे काँग्रेससंदर्भात काही ग्रह आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा निश्चितच होऊ शकते. आम्ही देखील चर्चा करू, असेही ते म्हणाले.

काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्त्वज्ञान आहे. काँग्रेसला डावलणे म्हणजे तत्त्वज्ञानाला, विचाराला आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाला डावलण्यासारखे आहे. काँग्रेसच्या विचाराला डावलणे याचा अर्थ ‘फॅसिस्ट’ वृत्तीला ताकद देण्यासारखे आहे. - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

भाजपविरोधात काँग्रेससह देशभरातील सर्व विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. राहिला प्रश्न नेतृत्वाचा, तर एका सामूहिक नेतृत्वात मोर्चा तयार करण्याचा प्रयत्न आहे. - नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री

ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य हे त्या देश विकणाऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट होते. सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली आहे की, त्यांनी देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
 

Web Title: Shiv Sena opposes alliance excluding Congress; says its will benefits to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.