लोकसभा निवडणुकीसाठी युतीची तुतारी वाजण्याआधी जवळपास रोजच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज मोदींच्या देशप्रेमाचं कौतुक करण्यात आलंय. परंतु, त्याचवेळी निवडणूक निकालांनंतरही आत्ताच्याच भूमिकेवर ठाम राहण्याचा सूचक इशाराही सेनेनं दिला आहे.
देश तोडणाऱ्यांच्या बाजूने शरद पवार का उभे आहेत, हा प्रश्न मोदींना आता पडला तसा निकालानंतरही पडावा. देशाचे विभाजन करणाऱ्यांनाच नव्हे तर अशा लोकांशी हातमिळवणी करणाऱ्यांनाही देशाच्या सत्ताकारणात यापुढे थारा मिळू नये. देशद्रोह्यांच्या बाजूने आज जे उभे आहेत ते उद्या राजकीय गरज म्हणून देशभक्तांच्या मांडीला मांडी लावून बसतील तर तो जवानांचा अपमान ठरेल, अशी रोखठोक ताकीदच 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानाची भूमिका नॅशनल कॉन्फरन्सनं मांडली आहे. त्याचे पडसाद देशभरातील प्रचारात उमटताना दिसताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सभांमध्ये याच मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पवारांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी आहे, पण ते देश तोडणाऱ्यांना साथ देताहेत, असा टोला त्यांनी हाणला होता. त्यानंतर, काश्मीरमध्ये जाऊन मोदींनी अब्दुल्ला आणि मुफ्तींवर हल्ला चढवला होता. त्याबद्दल शिवसेनेनं मोदींची पाठ थोपटली आहे.
>> काश्मीरचा स्वतंत्र झेंडा राष्ट्रभक्तांच्या काळजात खुपतोय. 370 कलम रद्द करू हा शिवसेना-भाजपचा मुख्य अजेंडा आहे व कोणी त्यास आव्हान देत असतील तर त्यांचे दात घशात घालून 370 कलम रद्द करायलाच हवे.
>> डॉ. फारुख अब्दुल्ला नक्की कोणाची भाषा बोलत आहेत तेसुद्धा समजून घ्या. अर्थात हेच डॉ. अब्दुल्ला यापूर्वी वाजपेयी मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होता.
>> हा सोयीचा राष्ट्रवाद आहे. देशभक्तीची ही रंगरंगोटी बंद व्हायला हवी.
>> जे डॉ. अब्दुल्लांचे तेच त्या पीडीपीच्या मेहबुबा मुफ्तींचे. त्यांचेही जम्मू-कश्मीरबाबत असलेले देशद्रोही विचार जुनेच आहेत. तरीही भाजपने त्यांच्याशी दोस्ताना केला होता व आम्ही एका तळमळीने या अभद्र युतीस विरोध करीत होतो.
>> आता या दोघांनीही जम्मू-कश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान हवा आणि 370 कलम रद्द केले तर देशातून फुटून निघू अशी भाषा केली व त्यावर मोदी यांनी प्रत्युत्तर दिले.
>> मोदी यांनी देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर हल्ला केला आहे हे उत्तम, पण दोन गोष्टींचा विश्वास मोदी यांनी देशाला द्यायला हवा.
>> उद्या सत्ता स्थापनेच्या आकडेबाजीत काही झाले तरी हिंदुस्थानचे विभाजन करण्याची भाषा करणाऱ्यांशी संधान बांधले जाणार नाही. ज्यांनी कश्मीरच्या तीन पिढय़ा उद्ध्वस्त केल्या, त्यातील कोणीच मोदींच्या मंत्रिमंडळात किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वाऱ्याला उभा केला जाणार नाही याची खात्री देणे म्हणजेच देश विभाजन करणाऱ्यांना ठोकून काढण्यासारखे आहे.
>> देश तोडणाऱ्यांच्या बाजूने शरद पवार का उभे आहेत, हा प्रश्न मोदींना आता पडला तसा निकालानंतरही पडावा. देशाचे विभाजन करणाऱ्यांनाच नव्हे तर अशा लोकांशी हातमिळवणी करणाऱ्यांनाही देशाच्या सत्ताकारणात यापुढे थारा मिळू नये. >> देशद्रोह्यांच्या बाजूने आज जे उभे आहेत ते उद्या राजकीय गरज म्हणून देशभक्तांच्या मांडीला मांडी लावून बसतील तर तो जवानांचा अपमान ठरेल.