"जय श्रीरामनेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:25 AM2021-05-04T08:25:51+5:302021-05-04T08:29:41+5:30

शिवसेनेचा भाजपवर जोरदार निशाणा; भाजपा महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार असल्याचा शिवसेनेचा टोला

shiv sena saamna editorial slams bjp over west bengal election chandrakant patil bhujbal comment | "जय श्रीरामनेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही"

"जय श्रीरामनेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही"

Next
ठळक मुद्देभाजपा महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार असल्याचा शिवसेनेचा टोलाबंगालात आपटल्यामुळे पंढरपूरचा विजयही त्यांना गोड वाटत नाही : शिवसेना

'पश्चिम बंगालवर विजय मिळवताच महाराष्ट्राकडे फौजा वळवू असे स्वप्न काही लोक पाहत होते. पंढरपूरच्या विजयाने त्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटलेच असते, पण महाराष्ट्र राज्याचे पुण्य कामी आले व बंगालात ममतांचा मोठा विजय झाला. त्याची आदळआपट दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातच जास्त सुरू आहे. प्रकरण धमक्या आणि इशारे देण्यापर्यंत पोहोचले. महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे,' असं म्हणत शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला.

महाराष्ट्राची राजकीय परंपरा व संस्कृतीचा अभ्यास कच्चा असल्याने हे घडत आहे. विरोधी मतांचा आदर करण्याची परंपरा या मातीची आहे. येथे तुकोबांची सत्य वाणी चालते. मंबाजीचे ढोंग चालत नाही. पंढरपुरात भाजपचा विजय झाला त्याबद्दल ‘विठोबा माऊली पावली’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली म्हणून कोणी विठोबा माऊलीवर राग धरेल काय? त्याच विठोबा माऊलीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व महाविकास आघाडीचे सरकार आले. संपूर्ण बंगाल दोनेक महिने ‘जय श्रीराम’च्या गर्जनांनी घुमत होता, पण ‘जय श्रीराम’नेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही. आता ममतांचा विजय झाला म्हणून महाराष्ट्रातील भाजपवाले श्रीरामास पुन्हा वनवासात पाठवण्याची धमकी देणार का? असा सवालही शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला.

काय म्हटलंय अग्रलेखात?

लोकशाहीत हार-जीत व्हायचीच. पाच राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला, पण आसामात भाजपचे व बंगालात ममतांचे अभिनंदन राहुल व सोनिया गांधी यांनी केलेच आहे. विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या बंगालमधील दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल.

ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे? विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे.

छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यात काय चुकलं? पाकिस्तानात सत्तांतर होते तेव्हा पंतप्रधान मोदीही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे अभिनंदन करतात. हा एक राजशिष्टाचार आहे, पण भुजबळांनी ममतांचे अभिनंदन केल्यामुळे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इतका राग आला की, त्यांनी भुजबळांना ते जामिनावर सुटले असल्याची आठवण करून दिली. पाटलांनी भुजबळांना इतर बऱ्याच धमक्या आणि इशारे दिले. थोडक्यात काय, तर भुजबळांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची क्षमता आपल्यात आहे, असे पाटील यांना सुचवायचे आहे का? हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. भुजबळ हे पाटलांना उत्तर देण्यास समर्थ आहेत, पण याचा एकच अर्थ घ्यायला हवा तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयम-संस्कार व संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभणारे तसेच परवडणारे नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी दिग्विजय मिळवलाच आहे व बंगाल काबीज करण्यासाठी जे गेले ते बंगालच्या खाडीत गटांगळय़ा खात आहेत. हे चित्र तुम्ही कसे बदलणार? 

ममता बॅनर्जी यांनी २१६ जागा जिंकण्याचा चमत्कार केला याबद्दल त्यांचे अभिनंदन सगळेच करीत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांचे जाहीर अभिनंदन केले. आता मोदी, शहा, राजनाथ सिंहांवरही चंद्रकांतदादा राग राग करणार की ममतांचे अभिनंदन केले म्हणून गुजरातमधल्या जुन्या प्रकरणांची थडगी उकरून काढण्याच्या धमक्या देणार?राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात. वर खाली होतच असते. महाराष्ट्रातील पंढरपूर पोटनिवडणूक भाजप जिंकले, पण बंगालात आपटल्यामुळे पंढरपूरचा विजयही त्यांना गोड वाटत नाही

Web Title: shiv sena saamna editorial slams bjp over west bengal election chandrakant patil bhujbal comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.