नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना ब्रेकफास्टसाठी एकत्र आणलं. यावेळी भाजपाविरोधी १४ पक्ष राहुल गांधींच्या आमंत्रणावरून एकत्र जमले होते. त्यावेळी केंद्र सरकारविरोधी अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिवसेनाही सहभागी झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत या बैठकीसाठी गेले होते.
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून चालतानाचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोबद्दल संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-काँग्रेस महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहेत. आता फक्त हातातला हात खांद्यावर आला इतकचं आहे. खांद्यावर हात ठेवला त्यात वाईट काय? आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य करताना पक्ष जवळ येऊन चालत नाही तर मनही जवळ यावं लागतं असं राऊतांनी सांगितले.
त्याचसोबत जर काही सकारात्मक पावलं पडत असतील तर लोकंही त्याचं स्वागत करतील. शिवसेनेला नेहमीच राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राजकारणात मानाचं स्थान आहे. राहुल गांधी आणि माझी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरेंचे अनेक निरोप त्यांना दिलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत. राज्यातील सरकार आपण चालवायचं यावरही ते ठाम असल्याचं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेणार आहेत राहुल
संजय राऊत म्हणाले होते की, राहुल गांधी यांची शिवसेनेच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. राहुल गांधींना बाळासाहेबांचा स्वभाव आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घ्यायचे आहे. शिवसेना प्रमुखांनी पक्ष आणि नेत्यांना कशा पद्धतीने हाताळले आणि त्याचे इतर पक्षांच्या नेत्यांशी कसे संबंध होते, हेही त्यांना जाणून घ्यायचे आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेण्यास ते अत्यंत उत्सुक दिसत होते. एवढेच नाही, तर राहुल गांधी महाराष्ट्र दौरा आणि युतीच्या सर्व नेत्यांना भेटण्यासंदर्भातही बोलले आहेत, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनचा राहुल गांधींचा हा पहिलाच दौरा असेल.
'राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मात्र, ते कधी येणार हे त्यानी सांगितले नाही. काँग्रेस प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी म्हटले आहे, की राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या भेटीबाबत काँग्रेस मुख्यालयातून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. वेळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याची घोषणा करतील अशी माहिती आहे.