मुंबई: गोव्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम (Goa Election 2022) जाहीर झाल्यानंतर आता आघाडी, युती यांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहायला लागले आहे. अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही भाजपविरोधी गट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रयत्नशील असताना पाहायला मिळत आहेत. मात्र, संजय राऊत यांच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर बोलताना, गेल्या ५० वर्षांत काँग्रेस जिंकली नाही त्या जागा मागतोय. आम्ही झोळी घेऊन उभे नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
गोव्यात महाविकास आघाडीचीप्रमाणे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत येणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपाला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही. राहुल गांधी यासाठी सकारात्मक आहेत पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे, हे मला माहिती नाही. ४० पैकी ३० जागा काँग्रेसलेल्या लढण्यास आम्ही सांगितले आहे. उरलेल्या १० जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या ५० वर्षात ज्या जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितल्या आहेत. काँग्रेसच्या खिशातल्या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. गोव्यात एकत्र लढलो नाही तर काँग्रेसचे एक आकडी आमदार सुद्धा निवडणून येणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
आम्ही मनापासून प्रयत्न केले पण...
गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले, पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील, त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू असून, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मगोप, गोवा फॉरवर्ड यांसह काही पक्ष रिंगणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी गोव्यात निवडणूक होणार असून, १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. काही निवडणूकपूर्व अंदाजांनुसार, भाजप गोव्यात सत्ता राखण्यास यशस्वी होऊ शकेल.