मुंबई: देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यातही विधानसभा निवडणूक (Goa Election 2022) होत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निवडणूक प्रभारी म्हणून गोव्यात पाठवले आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ओपन चॅलेंज दिले आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही. शिवसेनेने आपले डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात बोलताना लगावला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना हा माझा शब्द आहे
गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू, असे पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमधून तिकडे गेले आहेत, ते गेल्यावर भाजप तिथे फुटला. एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदारही पक्ष सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, भाजपमधील गळतीची ही सुरुवात आहे. ओपिनियन पोलनुसार भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असे सांगितलं जात आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.