मुंबई: मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. यावेळी समर्थकांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. यावरून दावे-प्रतिदावे सुरूच आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य केले असून, भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (shiv sena sanjay raut replied to bjp raosaheb danve on maratha reservation)
संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. याला संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री असोत. पक्षाचे आदेश, सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडे चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळे लावले आणि आमच्या सत्तेचे टाळे उघडले, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तसेच राजकारणात कुलूप आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात. ज्याच्याकडे कुलूप आहे, तो कुठल्याही गोष्टीला टाळे लावू शकतो आणि ज्याच्याकडे चावी आहे, तो कुठलेही टाळे उघडू शकतो. आमच्याकडे चावी आहे. त्या चावीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे राऊत म्हणाले.
“महिलांचा सन्मान करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठेय? सत्तेपाई सत्व गमावले”; भाजपचा आरोप
मराठा आंदोलनाला सर्वच घटकांचा पाठिंबा व सहानुभूती
रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहेत. ते बऱ्याचदा विनोद करत असतात. ग्रामीण नेतृत्व आहे. त्यांच्या शैलीचं मी नेहमीच कौतुक केले आहे, असे सांगत कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. तिथून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यातील सर्वच घटकांचा पाठिंबा व सहानुभूती आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडे घातले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकार नक्कीच तोडगा काढेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला आज बुधवारी भरपावसात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक सुरुवात झालेली आहे. काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मराठा समन्वय समितीचे कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले असून ते मूक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.