मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल अटक झाली. रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला. नारायण राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यापासूनच राज्यातलं राजकारण तापलं. राणेंना जामीन मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. यानंतर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राणेंचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत राणेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-१. नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगानारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोक असलेला फुगा फुगवून दाखवण्याचे ठरवले आहे.
२. पंतप्रधान स्वतःला अत्यंत ‘नॉर्मल’ माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणवून घेतात, हा त्यांचा विनम्र भाव आहे, पण राणे म्हणतात, ‘मी नॉर्मल नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे.’ राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत.
३. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ”मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,” असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल. मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत.
४. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा केल्याने महाराष्ट्राच्या संयमाचा बांध तुटला आहे. या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले, सर्वोच्च पदे दिली, पण नंतर हे महाशय शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. शिवसेना सोडून 20 वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरुच आहे.
५. २० वर्षांत राणेंनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरु ठेवले आहेत.