राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:15 PM2021-08-13T13:15:46+5:302021-08-13T13:18:46+5:30
Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत.
- मनोज मुळ्ये
रत्नागिरी : दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीवगळता अन्य कोठेही हे तीन पक्ष एकत्र आलेले नाहीत.राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र पंचायत समिती सभापती, विषय समिती सभापती निवडणुकीत चिपळूण वगळता कोठेही महाविकास आघाडी दिसलेली नाही. (Mahavikas Aghadi News)
केवळ चिपळूण पंचायत समितीत महाआघाडी
चिपळूण पंचायत समिती वगळता इतर आठही पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्रच आहेत. चिपळुणात सभापती निवडीसाठी महाआघाडी झाली आहे.
राजापुरात सेना - काँग्रेस आमनेसामनेच
थेट नगराध्यक्ष निवडणुकीत राजापुरात काँग्रेसचे जमीन खलिफे विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी राजापुरात मात्र काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कायमच एकमेकांसमोर उभे असतात.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पद नाही
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती निवडणूक झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्ष पदाची मागणी होत होती. पण शिवसेनेचे संख्याबळ खूपच मोठे असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीला कोणतेही पद दिले नाही.
चिपळुणात भाजपविरोधासाठी महाविकास आघाडी
नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. मात्र दोघांमध्येही वितुष्ट आले होते. त्यात चिपळूणमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्ष पद म्हणून सत्ता भाजपकडे होती. त्यावेळी भाजपला शह देण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाआघाडी झाली. ही आघाडी राज्याच्या सुत्रानुसार झालेली नसून, भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर झाली आहे. त्यामुळेच अनेक विषयांबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत नाही. भाजपला विरोध हेच मुख्य सूत्र असल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढतील, असे दिसत नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव म्हणतात...
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याने आम्ही त्याला बांधिल आहोत. स्थानिक पातळीवरही आघाडी करण्याची आमची तयारी आहे. मात्र शिवसेनेकडून अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.