मुंबई - महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे.‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल असा विश्वास सामना अग्रेलखातून शिवसेनेने व्यक्त करत लक्ष्मण सवदींना टोला लगावला आहे.
लोकशाहीत २० लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय? एखाद्या राज्याचा स्थापना दिवस हा पवित्र, मंगलमय दिवस असतो. त्या दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण गेल्या साठेक वर्षांत मराठी माणूस, भाषा, संस्कृतीवर जे निर्घृण हल्ले तेथे सुरू आहेत त्याचाच हा उद्रेक असतो. कर्नाटक व महाराष्ट्राचे व्यक्तिगत भांडण असण्याचे कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे; पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील 20 लाख मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या ७० वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरूआहे.
हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून २० लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत.
सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे.
कर्नाटक सरकारचा १ नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो. हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ २० लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? २० लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का?
हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला. तेथील मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी नाटय़गृहे, मराठी ग्रंथालये याबाबत अत्यंत अमानुष वर्तन स्वतंत्र हिंदुस्थानात केले जात आहे. १ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळण्याचे तेदेखील एक कारण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तेथील मराठी बांधवांशी किमान माणुसकीने वागायला काय जाते?
महाराष्ट्रातही लाखो कानडी बांधव आपले उद्योग-व्यवसाय करीत सुखाने राहत आहेत हे लक्ष्मण सवदीसारख्या मंत्र्याने विसरू नये. बेळगावातील भगवे झेंडे उतरवून ते पायदळी तुडवले जातात, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले जातात, मराठी भाषेतले फलक तोडले जातात हा मोगलाईचाच प्रकार आहे.
महाराष्ट्रातील राज्यपालांनी या अत्याचारांविरोधात कर्नाटकातील राज्यपालांशी कडक शब्दांत बोलायला हवे. किमानपक्षी राज्यपालांनी बेळगावच्या शिष्टमंडळास पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे.
सीमा भागातील जनतेला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ‘काळा दिवस’ पाळला व दंडास काळ्या फिती बांधून काम केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील भाजपसह इतर राजकीय पक्षही सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार दर्शन कानडी राज्यकर्त्यांना घडले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता.
कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत. नाही म्हणायला चंद्रकांतदादा पाटलांनी बेळगावसह मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यायलाच हवीत, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल पाटलांचे आभार! महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे.