Uddhav Thackeray: “तलवार उचलण्याची ताकद नाही अन्..."; स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:43 PM2021-06-19T19:43:06+5:302021-06-19T19:46:30+5:30

Shiv Sena 55th Vardhapan Din: शिवसेनेवर संकुचितपणाचे आरोप झाले तरी शिवसेना लढत राहिली. गेली ५५ वर्ष शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत बघत पुढे चालली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Shiv sena Uddhav Thackeray speech in Vardhapan Sohla, Target BJP And Congress also talk on Hindutva | Uddhav Thackeray: “तलवार उचलण्याची ताकद नाही अन्..."; स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

Uddhav Thackeray: “तलवार उचलण्याची ताकद नाही अन्..."; स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

Next
ठळक मुद्देसंकटाला घाबरणारा शिवसैनिक नाही. आत्मविश्वास आणि स्वबळ शिवसेनेकडे आहे. हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही, हिंदुत्व आमच्या ह्दयात आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे.कोरोनाच्या संकटकाळात राजकारण चाललं आहे त्याला विकृतीकरण म्हणतात.

मुंबई – कोरोनाच्या काळात अनेक राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही स्वबळाचा नारा देऊ. पण स्वबळ म्हणजे नेमकं काय? स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास असायलाच आहे. आत्मबळ आणि स्वबळ शिवसेनेने दिलं. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी मराठी माणसाला अपमानित होऊन जीवन जगायला लागत होतं. जर शिवसेनेची स्थापना झाली नसती तर मराठी माणसाची काय अवहेलना झाली असती याचा विचार करा. निवडणुकीपुरतं स्वबळ नाही. न्यायहक्क मिळवण्यासाठी, अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं स्वबळ हवं. अन्यायाविरोधात वार करण्याची ताकद  हवी. तलवार उचलण्याची ताकद नाही तर स्वबळ म्हटलं जातं. आधी तलवार उचलण्याची ताकद कमवा मग वार करा. निवडणुका येतात आणि जातात. हारजीत होत राहते पण आत्मविश्वास हवा. निवडणुकीत पराभव झाला म्हणून मनातून खचून जाऊ नका. मनातून खचला तर ते स्वबळ कसलं? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला आहे.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संकटाला घाबरणारा शिवसैनिक नाही. आत्मविश्वास आणि स्वबळ शिवसेनेकडे आहे. अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी स्वबळाचा हक्क आणि अधिकार शिवसेनेकडे आहे. ते फक्त निवडणुकीपुरतं नाही. शिवसेनेवर संकुचितपणाचे आरोप झाले तरी शिवसेना लढत राहिली. गेली ५५ वर्ष शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत बघत पुढे चालली आहे. या अनुभवातून शिवसेना पुढे चालली आहे. फेसबुकच्या माध्यमातून कोरोनासाठी माहिती देणं हा भाग वेगळा आहे. भाषण करणं हा विचित्र अनुभव आहे. भाषण करताना समोर जल्लोष पाहिजे. रखरखते शिवसैनिक, घोषणा टाळ्या नसतील तर भाषणात मज्जा येत नाही. एकतर्फी बोलतोय त्यामुळे काय बोलावं हे ठरलेलं नाही. जे आहे ते बोलत चाललोय असं त्यांनी सांगितले.

हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही

हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही, हिंदुत्व आमच्या ह्दयात आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे. युती करून आघाडी केली म्हणून हिंदुत्व सोडलं असं होत नाही. राज्याचा विकास करणं आणि गोरगरिबांना न्याय देणे यासाठी आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं असा अर्थ होत नाही. राजकारण आता बदलत चाललं आहे. कोरोनाच्या संकटकाळात राजकारण चाललं आहे त्याला विकृतीकरण म्हणतात. सत्ता पाहिजे म्हणून हे चाललं असेल तर सत्ता घ्यावी. माझ्यासाठी सत्तास्थापना महत्त्वाची नाही. पण आव्हान आलं ते स्वीकारलं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला काढला आहे.

शिवसेनेचे राजकारण हापापलेपणाचं नाही

तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणून हे साध्य झालं. तुम्ही नसता तर मला एक पाऊलही पुढे जाता आला नसतं. रात्री अपरात्री कोणाचा फोन आला तरी धस्स होतं, प्रशासकीय काम आणि शिवसैनिकांची मेहनत यामुळे दुसऱ्या लाटेवर आपण यश मिळवलं आहे. शिवसेनाप्रमुखांचे भाषण व्हायरल होत आहे. समोरचा फटकन् आवाज आला तर आपला ताडकन् आवाज आला पाहिजे. शिवसेनेची ओळख ही रक्तपात करणारी नाही तर रक्तदान करणारी आहे. आरोप करणाऱ्यांची काय ओळख आहे? रक्तसाठा कमी होत चालला आहे असं आवाहन केल्यानंतर शिवसैनिक हजारो बाटल्या रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवले. रक्ताच्या बाटल्या देताना ते रक्त कोणाला जातंय हे विचारत नाही. आमचं रक्तदान हे सर्वांसाठी आहे. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक मदतीला धावतात. बदनामी करणारे बदनामी करत राहतील. आरोप करणारे कोण आहेत? तुझं चारित्र्य स्वच्छ आहे का? आरोप करणारे आरोप करून पळून जातात. आम्ही आमच्या रुबाबात चाललो आहेत. शिवसेनेचे राजकारण हापापलेपणाचं असतं तर ती अजिबात टिकली नसती. शिवसेना कशाच्या जोरावर टीकली असेल तर शिवसेनाप्रमुखांच्या विचारावर पुढे जात चालली आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

निवडणूक आणि सत्ताप्राप्ती विचार बाजूला ठेवा

कोरोनाचा सामना आपण करतोय, किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविड १९ आणि पोस्ट कोविड आजार आढळतात. सध्या या कोरोनाच्या संकटात एकहाती सत्ता आणू असं म्हटल्यावर लोकं जोड्याने हाणतील. सत्ता हवी आहे त्याचा उपयोग जनतेसाठी काय होणार हे ठरवण्याची वेळ आली आहे. निवडणुका एके निवडणुका, सत्ताप्राप्ती हा विचार बाजूला ठेऊन कोरोना आणि आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार झाला पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Shiv sena Uddhav Thackeray speech in Vardhapan Sohla, Target BJP And Congress also talk on Hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.