डोंबिवली : कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसैनिक तथा माजी परिवहन सभापती राजेश कदम यांनी फडणवीस यांना ट्विट करून नागपूरमध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. नुसती टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर तुमचा डोंबिवलीच्या आप्पा दातार चौकात म्हणजेच फडके पथावर भव्य सत्कार ठेवू, अशा शब्दांत कदम यांनी त्यांना काेपरखळी मारली आहे. नागपूरमध्ये सध्या ४० हजार ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. दररोज येथे तीन ते चार हजार रुग्णांची भर पडते आहे. तेथे भाजपची सत्ता आहे. तुमचे प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नारायण राणे, किरीट सोमय्या, छोटा राणे, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये या सर्व काेराेना तज्ज्ञांना नागपूरमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली घेऊन जा. लागल्यास इतर छोट्या-मोठ्या पक्षातीलपण अनेक तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मदतीने नागपूरमध्ये कोरोनावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत. महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करत आहात. सत्ता काय येते जाते. तुम्ही फडणवीस पॅटर्न राबवारेल्वे, देऊळ, बस, दुकाने, फेरीवाले व इतर सर्व आस्थापना बंद न करता, लॉकडाऊन न करता काेराेना घालवण्याच्या तुमच्याकडे १०१ आयडिया आहेत. विशेषत: मोदी सरकारची मदत घेऊन दाखवून द्या संपूर्ण जगाला हा फडणवीस कसा चमत्कार घडवताे ते. सरकार, बृहन्मुंबई महापालिका अभिमानाने धारावी पॅटर्न सांगते तसेच तुम्हीही नागपूरवर नियंत्रण मिळवले तर फडणवीस पॅटर्न म्हणून तुमचे कौतुक करू.तुमच्याच काय तुमच्या अनेकांच्या स्वप्नातही नव्हते की पाच वर्षांत तुमची सत्ता जाईल म्हणून. आज मराठी माणूस कोरोनाच्या भयंकर विळख्यात आहे. कोरोना बघत नाही की हा भाजपचा आहे की शिवसेनेचा अशा शब्दांत कदम यांनी ट्विटद्वारे फडणवीस यांना सुनावले आहे. कदम यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.