मुंबई/पुणे/रायगड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये राणेंनी चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली.
युवासेनेला आदेश; शिवसेनेचा आक्रमक पवित्रानारायण राणेंच्या विधानानंतर महाड, नाशिक, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विरोधात आणखी एफआयआर दाखल होऊ शकतात. युवासेनेला तसे स्पष्ट आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत. त्यामुळे राज्यभरात युवासैनिकांकडून राणेंविरोधात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. राणेंना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे. शिवसैनिक आज राज्यभरात आंदोलनं करण्याच्या तयारीत आहेत. नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना
चिपळूणमधून समोर आली मोठी माहिती?नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश निघाल्यानंतर चिपळूणमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. राणे सध्या चिपळूणमध्ये आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केल्याचं समजतं. अटक टाळण्यासाठी कोणते कायदेशीर पर्याय असू शकतात, याची चाचपणी राणेंच्या लीगल टीमकडून सुरू आहे.
राणे अटक करून घेणार की...?राणेंच्या लीगल टीमकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. राणेंच्या अटकेचा राजकीय फायदा मिळवायचा की अटक टाळण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावयाची, यातला नेमका कोणता पर्याय भाजप स्वीकारणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली
राणेंच्या विरोधात कोणती कलमं दाखल?नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले. राणे राज्यसभेचे खासदार असल्यानं त्यांच्या अटकेवेळी प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंना अटक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना देण्यात येईल. हिंदी किंवा इंग्रजीत ही माहिती त्यांना दिली जाईल.
नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी आहे. मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश त्यांना पक्षाकडून मिळाली आहे. त्यातच सध्या ते कोकणात आहेत. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्याच बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपनं राणेंच्या मागे केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपात ताकद उभी केल्याचं बोललं जातं. त्यामुळे राणेंच्या अटकेचा मुद्दा गाजणार आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटू शकतो.