मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या वादांमध्ये अजून एका वादाची भर पडली होती. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या विधानावर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली असून, शिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा टोलाही लगावला आहे. (Shiv Sena's aggressive response to Amol Kolhe's statement )
शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे. तयार स्किप्ट वाचून बडबड करणाऱ्या कलावंतांना कधी कधी विस्मरण होते. तसेच अमोल कोल्हे यांचे झाले आहे. ज्या उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आले, त्यांनाच अमोल कोल्हे आज विसरले आहेत.
शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याचे अमोल कोल्हे सांगतात. असे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? असा प्रश्नही कान्हेरे यांनी विचारला. ज्या उद्धव ठाकरेंमुळे तु्म्हाला आणि तुमच्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली आहेत, त्यांना तरी विसरू नका, असा सल्लाही त्यांनी अमोल कोल्हे यांना दिला.
सध्या राज्यात अजित पवार आणि खुद्द शरद पवार हे उद्धव ठाकरेंशी चर्चा करून राज्य कारभार चालवत आहेत. त्यामुळे तुम्ही एवढा विचार करू नका. तुमची तेवढी कुवत नाही आणि क्षमताही नाही. त्यामुळे दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा, असा टोलाही कान्हेरे यांनी कोल्हेंना लगावला.
दरम्यान, शरद पवार साहेबांचा वरदहस्त डोक्यावर म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदाराला काही काम नसल्यामुळे वाद,भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम करित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा डोक्यावर हात आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, असा स्पष्ट इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला होता. कोल्हे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते.