मुंबई : शिवेसेनेचे मुखपत्र ‘सामना’त रविवारच्या लेखात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यातून असे संकेत मिळत आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शिवसेनेची अशी इच्छा होती की, देशमुख यांना या पदावरून दूर करावे. मात्र, शरद पवार यांनी त्यांना हटविण्याविरुद्ध भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेनेही आपल्या भूमिकेत बदल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हा लेख प्रकाशित झाला आहे, हे विशेष. अमित शहा यांनी या भेटीबाबत दुजोरा दिला नाही. मात्र, राजकारणात सर्व गोष्टी उघड करायच्या नसतात, असे विधान केले आहे. राष्ट्रवादीने अशा बैठकीचा इन्कार केला आहे. ‘महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्न, डॅमेज कंट्रोलचा फज्जा’, या लेखात म्हटले आहे की, गृहमंत्रीपदासाठी आवश्यक कुशाग्रतेबाबत देशमुख विसरले आहेत. या लेखात म्हटले आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. सचिन वाझे यांच्यासारखा ज्युनिअर ऑफिसर जर पैसे गोळा करण्याचे रॅकेट चालवीत होता, तर गृहमंत्र्यांना याची माहिती का नव्हती. अजित पवार यांनी संपादकीय लेखावर भाष्य करताना म्हटले आहे की, कुणीही आघाडी सरकारमधील वातावरण बिघडवू नये. कॅबिनेटचे पद कुणाला द्यायचे हा आघाडीतील ज्या- त्या राजकीय पक्षाचा विशेषाधिकार आहे. तीनही पक्ष व्यवस्थित काम करत आहेत.
वातावरण ढवळून निघालेnमुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटके प्रकरणानंतर या पक्षांमधील दुही समोर आली. nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.