जळगाव : राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले, तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे, असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी जळगावात केले. यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे काही खरे वाटत नाही, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनामुक्त गावे, गरजूंना मदत देण्यासाठी शासनाच्या योजना तसेच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या. या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी आजच्या राजकीय घडामोडींसह विविध पक्षांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केले. भाजप व शिवसेना यांची पुन्हा युती होऊ शकते का, या विषयावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, याविषयी पक्षप्रमुख, प्रवक्ते बोलतील. मात्र ज्यावेळी या दोन्ही पक्षांची युती होती, त्यावेळी मीदेखील समन्वय समितीमध्ये होते. ही युती का तुटली, ज्या मुद्द्यावर मतभेद झाले याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. युतीच्यावेळी जे ठरले त्यात विश्वासघात झाल्याने आम्ही इतर पक्षांकडे वळलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिष्टाचाराचा भाग म्हणून भेट असावीभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीविषयी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ही एक उत्सुकतेची कहाणी आहे. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, ते भेटू शकतात. राजकारण असल्याने यात काहीही होऊ शकते. कदाचित शिष्टाचाराचा भाग म्हणूनही ते एकमेकांना भेटले असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीतून ते एकत्रदेखील येऊ शकतात, मात्र कार्यकर्त्यांचे एकत्र येणे अशक्य वाटते.
‘लोकमत’चा आवर्जून उल्लेख : महिला विकासासाठी करीत असलेल्या कामात वेळोवेळी यश आले आहे. याची दखल ‘लोकमत’ने घेतली व ती राज्यभरात पोहोचविली, यामुळे जनजागृती होण्यास अधिक मदत झाल्याचाही उल्लेख डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.