राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा. पं.तींची आकडेवारीही लक्षनिय आहे. बिनविरोधच्या आकडेवारीत शिवसेनेने भाजपाला मागे टाकले आहे. यामुळे आजचे सर्व ग्राम पंचायतींचे निकाल सारे चित्र स्पष्ट करणार आहेत.
ग्राम पंचायतनिवडणूक म्हणजे मिनी विधानसभा निवडणूकच असते. अनेक ठिकाणी पक्ष नाही तर पक्ष पुरस्कृत गाव पॅनेल उभारलेले असते. यामुळे ही निवडणूक थेट पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. यामुळे मिळेल ते चिन्ह घेऊन उमेदवार रिंगणात उतरलेला असतो. अनेकदा शेजारी शेजारीच, घरातच दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असता. यामुळे काही काळ कटुता येते परंतू निकालानंतर आठवड्याभरात ती दूरही होते. अशा या स्थानिक पातळीवरच्या निवडणूकीचा आज निकाल लागणार आहे. अनेकांनी ग्राम पंचायत बिनविरोध केल्यास अमूक एवढा निधी देऊ वगैरे आश्वासने दिली होती. यामुळे राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा.पंचायतींची आकडेवारीही मोठी आहे.
यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना 520 ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत.