अल्पेश करकरे
मुंबई - नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. ३० डिसेंबरला महाविकास आघाडी सरकार तीन पक्ष एकत्र येत मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात शिवसेनेने जेष्ठ नेत्यांना डावल्यामुळे, तसेच आता पक्षश्रेष्ठी आपल्या मताला किंमत देत नाहीत आणि आपली काम होत नाहीत त्यामुळे नाराज नेत्यांची संख्या शिवसेनेत मोठी आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री असूनही सरकारमध्ये कामं होत नाहीत, जुन्या जाणत्या नेत्यांचा पदरी काहीच नसल्याने आणि अनेक समस्यांनी शिवसेनेत दबक्या आवाजात नाराजी धुमसतेय. याचाच फटका आगामी राजकारणात शिवसेनेला पुढे बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नुकतच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला मनातील सगळी व्यथा व्यक्त केली. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, माजी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत या जुन्या जाणत्या नेत्यांना मविआ सरकार पासून दूरच ठेवण्यात आलं आहे. पक्षातून आता काहीही किंमत मिळत नसल्याने त्यांची कुचबुज सुरू आहे हे सर्वश्रुत आहे. सरकार स्थापन होताच नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे भास्कर जाधव, तानाजी सावंत यांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतून ते नाराज असल्याचं दाखवूनही दिलं. यानंतर आता दोन वर्षांनी थेट रामदास कदम यांनी आपली खंत मांडली. त्यातच आता राज्यातील अनेक शिवसेनेचे नेते,पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची ही नाराजी हळूहळू बाहेर येण्याची शक्यता दिसत आहे. त्याचा फटका आगामी काळात बसण्याची दाट शक्यता आहे.
नाराज नेते स्वत:चा मार्ग निवडणार
सत्ता नसतांना नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जातात यात नवीन काही नाही. मात्र गेल्या दोन वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे. मुख्यमंत्रिपद आहे पण तरीही शिवसेनेमधील जेष्ठ शिवसैनिक, उपनेते, कार्यकर्ते एक तर पक्ष सोडून जात आहेत किंवा आपली नाराजी विविध मार्गांनी व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. त्यानंतर सुद्धा शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून गेले आहे. त्यात आता आणखी शिवसेनेत नेतेमंडळी नाराज आहेत ते आपला मार्ग शोधत आहेत. आगामी महापालिका, नगरपरिषद ,पंचायतीच्या निवडणुका आहेत त्यात नाराज मंडळी आपला मार्ग शोधतील का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या नेत्यांनी दोन वर्षात शिवसेना सोडली
राज्यात दोन वर्षात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला अनेक नेत्यांनी जय महाराष्ट्र केला आहे. त्यात माथाडी कामगार नेते मत नरेंद्र पाटील यांनी मार्च महिन्यात शिवाबंधन सोडत अखेर जय महाराष्ट्र करत शिवसेना सोडली. महाविकास आघाडी सरकार येऊन दीड वर्ष होत आले तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ मागूनही ते भेटत नाही. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले होते. माजी मंत्री व शिवसेना उपनेते अशोक शिंदे आणि ठाण्याचे सुरेश म्हात्रे यांनीही स्थानिक पातळीवर डावलण्यात येत असल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तसेच माजी आमदार सुभाष साबणे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी आघाडी सरकारमधील मित्र पक्षाच्या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच महत्वाचे म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांनी ही विविध पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे.
आता शिवसेनेत सध्या नाराज नेते कोण ?
सत्तेत आल्यानंतर तीन पक्षांचा सरकार असल्यामुळे शिवसेनेवर सध्या मंत्रीपदांच्या संख्येची बंधन आहेत. फडणवीस सरकारमध्ये असताना ही संख्या जास्त होती. परिणाम शिवसेनेत सध्या नाराज नेत्यांची एक फळीच तयार झाली आहे. यात मंत्रिपद न मिळाल्याने व पक्षश्रेष्ठी ऐकत नसल्याने प्रताप सरनाईक, दीपक केसरकर, दीपक सावंत, रामदास कदम, रवींद्र वायकर,आशिष जयस्वाल, तुकाराम काते आणि अनेक नेते नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काम होत नसल्याने आणि जुन्या जाणत्याना डावलल्यामुळे जिल्हाध्यक्ष व उपजिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक देखील नाव न घेण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त करत आहेत.
नाराजीची कारणे काय ?
कार्यकर्त्यांपासून पक्ष हा मोठा होत असतो. कार्यकर्ते पक्षाला सत्तेत बसवतात, तसंच खालीही उतरवण्याची ताकद ठेवतात. शिवसेनेत सध्या कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना बरोबर थेट संवाद होत नसल्यामुळे आणि मार्गदर्शन होत नसल्याने नाराज आहेत. आपला पक्ष राज्यात सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर निधी मिळत नसल्याने अनेक नेते नाराज आहेत. तसेच जुने जाणते नेते पक्षात व सत्तेत महत्वाचं पद नसल्याने नाराज आहेत. तसेच पक्षात काही मोजक्याच नेत्यांचा बोलबाला आहे आणि ते नेते आपल्या सोयीनुसार राजकारण करत असल्याने कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत. जुन्या नेत्यांना पक्षप्रमुखांची थेट संवाद साधता येत नाही त्यामुळे देखील नाराजी आहे. स्थानिक पातळीवर आघाडीच्या इतर पक्षांमुळे अनेकांची कोंडी होत आहे त्यामुळेही नाराजी आहे अशी सर्व माहिती जुने शिवसैनिक आणि नेते यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितली आहे.