मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली, त्यावरून शिवसेना-भाजपा यांच्यात पुन्हा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. अमित शहांचे विधान यावर्षीचं सर्वात विनोदी आणि हास्यंस्पद आहे, शिवसेनेला आव्हान देणारे स्वत:चं संपले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला आणि अमित शहांना लगावला आहे.
शहांवर टीका करताना अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही कोणतंही वचन दिलं नव्हतं हे सांगायला अमित शहांना सव्वा वर्ष लागलं...तुम्ही वचन दिलं नव्हतं तर सत्तासंघर्षावेळी महाराष्ट्र सोडून हरियाणात का गेलात? ठाकरे घराणं आणि शिवसेना दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे..बंद खोलीनंतर खाली आल्यावर अमित शहा गेले, तेव्हा शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्रिपदाबाबत सांगितले होते, पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेत ५०-५० टक्के सत्तावाटप करण्यात येईल अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं? शिवसेनेची शिडी वापरून भाजपा महाराष्ट्रात उभी राहिली. शिडी नाही म्हणूनच आता भाजपा सत्तेतून बाहेर गेली असं त्यांनी सांगितले. (Shiv Sena Arvind Sawant Statement on BJP Amit Shah)
“शिवसेना आमचं जुनं प्रेम"; Valentine Day साठी नितेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गिफ्ट
तर शिवसेना संपली असती हे अमित शहांचे विधान विनोद आणि हास्यस्पद आहे. शिवसेनेला अनेक आव्हानं, आक्रमणं मिळाली, पण ज्यांनी आव्हानं दिली तेच संपले, शिवसेना आहे तिथेच आहे. कलमाडींनी खंडाळ्याच्या घाटापुढे येऊ देणार नाही असं आव्हान शिवसेनेला दिलं होतं, आज शिवसेना दिल्लीपर्यंत पोहचली आहे. शिवसेना एक विचार आहे. ती संपणार नाही. त्यामुळे अशा शापांना आम्हा दाद देत नाही असंही अरविंद सावंत यांनी बजावलं.
दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले
नारायण राणे आयत्या बिळावर नागोबा आहेत, जिथे सत्ता तिथे ते..हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली, त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, तसेच त्यांच्या बाजूला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते त्यांनाही विचारायला हवं होतं की राणेंबद्दल सभागृहात काय म्हटलं होतं? नारायण राणे यांनी भाजपाला गुंडाचा पक्ष आहे असा आरोप केला होता. त्याचं उत्तर देताना नारायण राणे कसे गुंड आहेत ते फडणवीसांनी सभागृहात सांगितले..त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसले. केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंना घेतलं तरी काय फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल, धमक्या देऊन माणसांना पक्षात घ्यायचं हेच भाजपाचं काम आहे असा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपावर केला आहे.
भाजपानेही यू टर्न घेतला
कृषी कायद्यावरून पंतप्रधानांनी विरोधकांना यू टर्न घेतल्याचं म्हटलं पण ज्यावेळी मागील सरकार काळात हे विधेयक आलं तेव्हा भाजपा नेत्यांनीही विरोध केला होता, सुषमा स्वराज यांनी तर अडत्यांची बाजू घेतली होती, म्हणजे विरोधात असताना विरोध करायचं आणि सत्तेत आल्यानंतर तो कायदा आणायचं असं भाजपाचं धोरण आहे. भाजपाने यू टर्न घेऊनच कृषी कायदा आणला. आंदोलनजीवी म्हणणाऱ्यांनी सत्तेत नसताना जे आंदोलन केले ते आठवावं, म्हणजे रथयात्रा, महागाईसाठी आंदोलन केले, मग भाजपाही आंदोलनजीवी झाली ना, त्याच आंदोलनातून तुम्ही आज सत्तेत आला ना..असा टोला अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर लगावला आहे.
एका कॉलला किती अंतर आहे?
सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आंदोलन संपवा, चर्चेला या असं आवाहन केले, मग एका कॉलला किती अंतर आहे..३ महिन्यापासून शेतकरी तिथे आंदोलनाला बसला आहे. मग पंतप्रधानांना एक कॉल शेतकऱ्यांना करण्यास काय हरकत आहे..सभागृहातून आवाहन करतायेत एक कॉल करून शेतकरी नेत्यांना बोलवा, चर्चा करा...काय मागण्या आहेत ते समजून घ्या...थेट त्यांना कॉल करून बोलावून घ्या असं शिवसेनेने म्हटलं आहे.