मुंबई - केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (BJP Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केले. या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानावर शिवसैनिक चांगलेच संतापलेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. तसेच शिवसेना नेतेही यावर आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत.
शिवसेनेने आता नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे (Shivsena Dr. Manisha Kayande) यांनी राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या ट्विर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना रोज मुजरा करावा लागतोय. मंत्रीपद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मातोश्रीवर टीका करावीच लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही" असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
मनीषा कायंदे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत. दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना मुजरा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही काम राहीलेलं नाही. त्यांच्यावर एकच जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करा. मातोश्रीवर टीका करा आणि शिवसेनेवर टीका करा. हेच त्यांचं ऑक्सिजन आहे. आणि हे त्यांनी केलं नाही तर त्यांचं मंत्रीपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावंच लागणार त्यामुळे नारायण राणे काय करतायत त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही" असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.