सिंधुदुर्ग: 'बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन घेण्याएवढे ते थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी का केली होती ?' असा सवाल शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना केला आहे. तसेच, 'बाळासाहेब जिवंत असताना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर नाटकं करायची,' अशी टीकाही केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
यावेळी केसरकर म्हणाले की, 'बाळासाहेब जिवंत असताना त्यांना त्रास दिला आणि ते गेल्यावर नाटकं करायची, हे मला अजिबात आवडलं नाही. जर बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी का केली होती ? त्यामुळे राणेंनी नितीमत्तेच्या गोष्टीच करू नयेत,' असा टोला केसरकर यांनी लगावला.
केसरकर पुढे म्हणाले की, 'राजकारणासाठी मी माझ्या प्रॉपर्टी विकतो, कर्ज घेतो, ते कर्ज फेडतो, पण माझी नैतिकता कधी ढासळली नाही. ही नैतिकता असल्यानंच मी लढे देऊ शकतो. माझा लढा कोकणाचा विकासासाठी आहे. राणेंच्या मुलानं मला धमक्या दिल्या, पण या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही,' असंही केसरकर म्हणाले.