आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या निमित्तानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला खासदारांनी आपले विचार मांडले. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात महिला खासदारांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या दरम्यान, महिला आरक्षणाचा विषय सभागृहात आला. महिलांना केवळ ३३ टक्के आरक्षण का दिलं जात आहे? महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सभागृहात यावर भाष्य केलं. "देशात २४ वर्षांपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. परंतु आता ते ३३ टक्क्यांवरून वाढवून ५० टक्के केलं गेलं पाहिजे. जेव्हा देशातील महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे तर महिलांचं प्रतिनिधीत्वदेखील ५० टक्के असलं पाहिजे," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. "लॉकडाऊनदरम्याम महिलांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो डोमेस्टिक रूपापासून मानसिक रुपापर्यंत आहे. अशा परिस्थितीत या विषयांवर सभागृहात चर्चा होणं आवश्यक आहे. महिलांना त्यांचे अधिकार देणं आवश्यक आहे," असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबद्दल सदनात भाष्य केलं, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते कार्ति चिदंबरम यांनीदेखील एक ट्वीट केलं. "तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान ३३ टक्के तिकिटं ही महिलांनाच देण्यात यावी," असं आवाहन त्यांनी केलं.
३३ टक्के का?, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं पाहिजे; प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 11:28 AM
महिलांची लोकसंख्या अर्धी असताना त्यांना नेतृत्वही अर्धच दिलं गेलं पाहिजे असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.
ठळक मुद्देमहिलांची लोकसंख्या अर्धी असताना त्यांना नेतृत्वही अर्धच दिलं गेलं पाहिजे असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.तामिळनाडूतही ३३ टक्के तिकिटं महिलांना देण्यात यावी, कार्ति चिदंबरम यांचं ट्वीट