मुंबई – भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं लाड यांनी म्हटल्याने शिवसेनेचे नेते संतापले आहेत. आमदार प्रसाद लाड यांच्यावर चहुबाजूने टीका होत असून तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढव असा टोला शिवसेना नेते राजन साळवी यांनी लाड यांना लगावला आहे.
शिवसेना(Shivsena) नेते राजन साळवी म्हणाले की, शिवसेनेच्या मतांवर तू आमदार झालाय. हिंमत असेल तर राजीनामा दे आणि निवडणूक लढ. मग बघ शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील. पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा दे असं त्यांनी इशारा दिला आहे. तर शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करून देईल. वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
"नारायण राणेंना स्वाभीमानचा खूप मोठा गट आज राणेंमुळे भारतीय जनता पक्षात आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. पुढच्या वेळी आपण जरा कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात गणवेशात येऊ नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला त्यांचा उपयोग होईल. एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू" असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.
संजय राऊतांनी उडवली खिल्ली
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार? अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रसाद लाड यांची खिल्ली उडवली आहे.
शिवसेनेचे बालेकिल्ले पाडून दाखवू
महाराष्ट्रात किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही प्रसाद लाड म्हणाले. भाजपानं इतकी वर्ष शिवसेनेला ताकद देण्याचं काम केलं आणि त्यांची ताकद मोडून काढायचं काम करू, असा इशारा देखील लाड यांनी दिला होता.