मुंबई – गेल्या काही दिवसांपासून जमीन व्यवहारावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे, कोलाई व महाकाली येथील जागेच्या प्रकरणी खोट्या आणि बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप वायकरांनी सोमय्यांवर केला आहे. (Shiv Sena leader Ravindra Vaikar has sent a defamation notice to BJP leader Kirit Somaiya)
रवीद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार सोमय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी दिला आहे. काही महिन्यांपुर्वीच किरीट सोमय्या यांनी मनिषा रविंद्र वायकर तसेच रश्मी उद्धव ठाकरे(Rashmi Uddhav Thackeray) यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच वरील माहिती निवडणुक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता.
एवढेच नव्हे या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी (एका बंगल्याची किंमत रुपये ५ कोटी आहे.) केल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला. परंतु यावेळी त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नव्हते. त्याचबरोबर महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले व शहीद बलवा यांच्याकडून रुपये २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी खोटे आरोप करीत वायकर, त्यांचे कुटुंब तसेच पक्षाची नाहक बदनामी तर केलीच, जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमाही मलिन केली असं नोटिसीत म्हटलं आहे.
दरम्यान, यातील कोर्लाई जमीन प्रकरणी सोमय्या यांच्या आरोपांची काही विविध प्रसारमाध्यमांनीच पोलखोल केली. परंतु मार्च महिन्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी पुन्हा वायकर यांच्यावर खोटे आरोप करत जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा जाणुन बुजुन प्रयत्न केला. सातत्याने बिनबुडाचे आरोप करत नाहक आपली, कुटुंबाची तसेच पक्षाची बदनामी करणार्या सोमय्या यांना वायकरांनी मानहानीची नोटीस पाठवून उत्तर दिलं आहे, त्याचसोबत या नोटीसीत सोमय्या यांनी कुठलेही सबळ पुरावे न देता केलेले आरोप जाहीररित्या मागे घेत जाहीर माफी न मागितल्यास पुढील क्रिमिनल कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी दिला आहे.