मुंबई - "राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी" असं म्हणत शिवसेनेने भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. "राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते" असं म्हणत "मेंढपाळाची वेदना" या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
"सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे. थंडीवाऱ्यात पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एक महिन्यापासून बसला आहे. ते शेतकरीलोकशाही स्वातंत्र्याचे मारेकरी आहेत, असा चिखल मोदी सरकारने उडविला आहे" असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच "आपल्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांची जखमही माहीत आहे आणि उपचारही माहीत आहे, पण मोदी यांची तऱ्हा अशी की, दुखणे पोटाला व प्लास्टर पायाला. सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे" असं म्हणत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
- आपले पंतप्रधान मोदी यांनाही दुःख आहे व ते त्यांनी व्यक्त केले आहे. मोदी यांनी आता त्यांचे नवे दुःख लोकांसमोर मांडले आहे. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत असतात व माझा अपमान करतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे हे धक्कादायक आहे.
- आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करीत आहे? पंतप्रधानांचा अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय? काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचे भाजप पुढाऱ्यांनी एका बाजूला सांगायचे व त्याचवेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे.
- विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे. देशातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून वर आला आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून थंडीवाऱ्यात आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांचा हा आक्रोश लोकशाहीचा आवाज नाही काय? या प्रश्नाचे आधी उत्तर द्या.
- आता राहुल गांधी काय म्हणाले ते पहा. गांधींचे बोल मोदी यांना टोचले. गांधी सांगतात, ''देशातील लोकशाही संपुष्टात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवले जात आहे. दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधानांना चिंता नाही. ते त्याबाबतीत कुचकामी आहेत. तीन-चार भांडवलदारांच्या फायद्यासाठीच मोदी देश चालवत आहेत,'' असा टोला राहुल गांधी यांनी मारल्यामुळे मोदी यांना वेदना झाल्या.
- गांधी हे टोमणे मारतात व माझा अपमान करतात, असा त्यांचा आरोप आहे. हे एकवेळ मान्य करू, पण गांधी म्हणतात त्यात अजिबात तथ्य नाही, असे मोदी यांना म्हणायचे आहे काय? दिल्लीतल्या टोमणेबाजांना लोकशाही शिकवायची आहे, असे मोदी सांगतात व त्यासाठी जम्मू-कश्मीरचे उदाहरण देतात. जम्मू-कश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या, हे लोकशाहीचे उदाहरण असल्याचा दावा मोदी यांनी केला, पण तेच मोदी सरकार दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवून त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही.
- जम्मू-कश्मीरमधील निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात कोरोना संक्रमण आणि प्रचंड थंडी असूनही तरुण, वृद्ध, स्त्रीया मतदान करण्यासाठी बूथपर्यंत पोहोचल्या. लोकशाही मजबूत करण्यासाठी जम्मू-कश्मीरच्या जनतेचे आभार मानतो, असे पंतप्रधान म्हणतात. पण त्याच थंडीवाऱ्यात पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एक महिन्यापासून बसला आहे. ते शेतकरी लोकशाही स्वातंत्र्याचे मारेकरी आहेत, असा चिखल मोदी सरकारने उडविला आहे.
- सरकारविरोधात कोणी बोलत असतील म्हणून त्यांची गळचेपी करणे किंवा अशा लोकांशी संवाद तोडणे म्हणजे लोकशाही नव्हे. पंतप्रधान मोदी हे देशाच्या लोकशाहीचे रखवालदार आहेत. त्यांच्या भाषेत ते प्रधानसेवक किंवा चौकीदार आहेत. सरकारने शेतकऱयांसाठी अनेक योजना जाहीर केल्या, त्या चांगल्याच आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात काल 18 हजार कोटी जमा केले. तरीही दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी असंतुष्ट असेल तर त्याची वेदना वेगळी आहे.
- खरे सांगायचे तर आपल्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांची जखमही माहीत आहे आणि उपचारही माहीत आहे, पण मोदी यांची तऱ्हा अशी की, दुखणे पोटाला व प्लास्टर पायाला. सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे, याला अर्थ नाही. सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळय़ा झाल्या आहेत. शेळय़ा झालेले एकमेकांना सांगत आहेत की, 'मेंढपाळाने छान व्यवस्था केली.'
- वाघ, लांडगे, हत्ती, सिंह यांनीही शेळ्या-मेंढ्यांसारखे बॅss बॅss करावे व कोणी गर्जना केली तर तो अपमान, ही लोकशाही नाही. यालाच लोकशाही म्हणावे, असा दबाव टाकणाऱ्यांना लोकशाही शिकवायची गरज आहे. पंतप्रधान जम्मू-कश्मिरातील जिल्हा विकास परिषद निवडणुकांवर बोलतात, पण लडाखमध्ये घुसलेल्या चिनी सैन्यावर बोलत नाहीत. विरोधकांनी घुसखोर चिनी सैन्याचा विषय काढला की, त्यांना तो अपमान किंवा टोमणे वाटतात.
- पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांना कोण कशाला टोमणे मारतील? त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांचे राज्य बहुमतावर सुरू आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग हे त्यांच्या बहुमताचे रखवालदार आहेत, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे टोमणे वगैरेची चिंता का करता? मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही. राहुल गांधी यांना गेल्या सहा वर्षांत या मंडळींनी मारलेले टोमणे एकत्र केले तर मोठे ग्रंथ निर्माण होतील.
- राहुल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा करणाऱ्यांनी दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांची धास्ती का बाळगावी? पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा वापर सध्या सुरू आहे, त्यास काय म्हणावे? शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही अधूनमधून टोमणेबाजी सुरूच असते. राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱयांनी याची तयारी ठेवायलाच हवी.
- मोदी सरकारचे भाग्य असे की, आज विरोधी बाकावर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते.