बिहार निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावे लागलेल्या भाजपावर शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला आहे.
निवडणूक लढवताना काही लोक गांधीजींच्या "साबरमती" सारखे असतात पण नंतर ते शरद पवारांच्या "बारामती"सारखे होतात. म्हणजेच निवडणुकीआधी साबरमती आता बारामती असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य भाजपा नेत्यांच्या बारामती भेटीवर लगावला आहे.
राज्य सरकार जर मस्तीत वागत असेल तर पाठिंबा काढून घेऊ अशी धमकी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधल्या प्रचारसभेत भाजपाला दिली आणि राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी असलो तरी संघर्षाची भूमिका कायम राहील असे संकेत दिले.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या कमकुवत व कुचकामी नेतृत्वामुळे भाजपाचा विजय झाला ज्या राज्यात सक्षम नेतृत्व होते तिथे भाजपाला फारसे यश मिळाले नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सदासर्वकाळ निवडणूक जिंकण्याची जादू कोणाकडेच नसते असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
महागलेल्या तूरडाळीच्या मुद्यावरून फडणवीस सरकारला उद्धव ठाकरेंनी पुन्हा लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या विधानाचा वापर करत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या ‘डायलॉग’प्रमाणेच ‘तूरडाळीच्या भावाचे काय झाले?’असा सवाल ठाकरेंनी फडणवीसांना विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला आहे. स्मार्ट सिटी हा मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांचा नवा वसाहतवाद संस्थानशाही निर्माण होणार असेल तर शिवसेना निदान ‘मुंबई’सारख्या शहरांना धनदांडग्यांची कायमस्वरूपी रखेल होऊ देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाने नेमलेले अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री व भाजपचे इतर मंत्री ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसून हा रक्तदोष आहे अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.
उद्योगपतींचं कर्ज माफ होतं मग शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत विचारला. स्वाती पिटलेच्या आत्महत्या प्रकरणावरुनही त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत ही शरमेची बाब आहे असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष व सत्तेत भागीदार असलेल्या भाजपावर अनेकवेळा तोफ डागली. या संदर्भातली काही उदाहरणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपरोधिक टीका केली आहे. काँग्रेसचे पंतप्रधान अचानक लाहोर किंवा कराचीत उतरले असते तर भाजपने त्यांच जंगी स्वागत केलं असतं का? असा खोचक सवालही अग्रलेखात विचारला आहे.