नवी मुंबई : गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचे उत्तर द्यावे. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुळे म्हणाल्या.आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदीय अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचे वक्तव्य केले होते. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपाचे निर्णय राज्य पातळीवरील घेतले जातील. कार्यकर्त्यांनी मतभेद न ठेवता एकत्र काम करण्याचे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. तर नवी मुंबईतील सर्व कार्यकर्ते एकत्र केल्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले. शरद पवार यांनी राज्यात जो इतिहास घडविला, तोच इतिहास नवी मुंबई शहरात घडवायचा आहे. तीन पक्षांची ताकद एकत्र आली तर महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, युवक अध्यक्ष राजेश भोर, माजी नगरसेविका सपना गावडे, संगीता बोऱ्हाडे, माजी नगरसेवक संदीप सुतार, वैभव गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत सत्ता परिवर्तन होणार जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी तिकडेच रहावे. परत माती कराय़ला येऊ नका, असा टोला सुळे यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. जोरदार तयारी करून नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जा. यावेळी नवी मुंबईत सत्तापरिवर्तन होणार, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.