- हरीश गुप्ता नवी दिल्ली : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात विरोधी पक्षांची आघाडी तयार करणे, हे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासाठी दु:स्वप्न ठरताना दिसत आहे. छोटे पक्ष दोन्ही काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.शरद पवार यांच्याकडे आघाडीची जबाबदारी आहे. छोट्या पक्षांना समजावण्यात त्यांना अडचण येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला ४ जागा देण्याची दोन्ही काँग्रेसची तयारी आहे. आंबेडकर १२ जागा मागत आहेत. राजू शेट्टींसाठी एक जागा देण्यास राष्ट्रवादी तयार असून, काँग्रेस आपल्या कोट्यातील जागा देण्यास तयार नाही. बहुजन विकास आघाडीस काँग्रेस जागा सोडायला तयार नाही.ओवेसी यांचा एमआयएम बहुजन वंचित आघाडीत असला, तरी राज्यात एकही जागा लढविणार नाही. पण, आंबेडकर हे ओवेसी यांच्या हातचे बाहुले बनल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटते. त्यांची आघाडी भाजपाच्या इशाऱ्यावर मतविभागणीचा प्रयत्न करते, असा काँग्रेस-राष्ट्रवादीला संशय आहे. आंबेडकरांना ४ जागा मिळू शकतात; पण त्यांना ८ जागा हव्या आहेत. सपा-बसपाला कोणत्या जागा द्यायच्या, हाही प्रश्न आहे. शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. तथापि, सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यात त्यांना यश न आल्याने आघाडीत बिघाडी होईल की काय, अशी चर्चा सुरू आहे.प्रफुल्ल पटेल रिंगणात नाहीत?राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ते राज्यसभेचे सदस्य असून, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन काहीच साध्य होणार नाही, असे पक्षाला वाटते.
काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छोट्या पक्षांची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:33 AM