नवी दिल्लीदेशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या स्थानिक आणि पंचायत निवडणुकांच्या निकालांबाबत माहिती देण्यासाठी भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. इराणी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
"अरुणाचल प्रदेश असो वा काश्मीर भाजपने सर्वच ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. तर काँग्रेसचा सुपडासाफ होताना दिसत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जिल्हा परिषदेच्या १८७ जागांवर विजय प्राप्त केला. तर आतापर्यंत ६४५० ग्राम पंचायतींमध्ये भाजपला यश आलं आहे. पासीघाट पालिका निवडणुकीमध्ये तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत", असं स्मृती इराणी म्हणाल्या.
कृषी कायद्यांवरुन ग्रामीण भागातील जनतेला आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असतानाही देशातील ग्रामीण भागांमध्ये भाजपला जोरदार समर्थन मिळत आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केली. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत देशात ठिकठिकाणी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजला मोठं यश मिळालं आहे", असंही त्या म्हणाल्या.
"देशात ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती त्याठिकाणी आज भाजपने अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे. तर केरळमध्येही भाजप मजबूत स्थितीत आहे. तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रकार सुरू आहे", असा खळबळजनक आरोप इराणी यांनी केला.