नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. तसेच तृणमूलला मत न दिल्याने हत्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. महिलांवर बलात्कार होत आहेत, पण मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत असा सवाल आता स्मृती इराणी यांनी विचारला आहे. स्मृती इराणी यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
"मी न्यायालयाचे आभार व्यक्त करते कारण छळ, खून आणि बलात्कार झालेल्या महिलांना आत्मविश्वास मिळेल, त्यांना न्याय मिळेल. मी लोकशाहीमध्ये प्रथमच पाहत आहे की मुख्यमंत्री लोकांचा मृत्यू होताना पाहत आहेत कारण त्यांनी त्यांना मत दिले नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. तसेच "आपल्या देशात पहिल्यांदा निवडणुकीच्या निकालानंतर हजारो लोक आपली घरे, गाव सोडून राज्याच्या सीमा ओलांडत आहेत. ममता बॅनर्जी आणि तृणमूलची माफी मागत आहेत. धर्म परिवर्तनासाठी तयार असल्याचे म्हणत आहेत. महिलांना घराबाहेर काढून उघडपणे बलात्कार केला जातो. 60 वर्षीय महिलेने सुप्रीम कोर्टात असे सांगितले की, 6 वर्षांच्या नातवासमोर तिच्यावर बलात्कार केला, कारण ती भाजपाची कार्यकर्ता होती. मुख्यमंत्री गप्प राहून आणखी किती बलात्कार पाहतील?" असं म्हटलं आहे.
"कोरोना संसर्गासाठी मोदी-शहांना जबाबदार ठरवणं ममतांचे 'संस्कार'"; स्मृती इराणी संतापल्या
स्मृती इराणी यांनी याआधीही काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. "कोरोना संसर्गासाठी मोदी-शहांना जबाबदार ठरवणं ममतांचे 'संस्कार'" असं म्हणत इराणी यांनी निशाणा साधला होता. तसेच "पश्चिम बंगालमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात" अशा शब्दांत त्यांनी ममता बॅनर्जींवर बोचरी टीका केली होती. "मला हे ऐकून धक्काच बसला की, कोरोना महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शहा यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात" असं म्हणत स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती.
"रुग्णालयात उपचारादरम्यान आईसोबत दुष्कृत्य झालं अन्..."; मुलीची स्मृती इराणींकडे तक्रार
महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. लखनऊच्या डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमधील स्टाफवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दुष्कृत्य आणि मारहाणीसारखे आरोप केले आहेत. घाबरलेल्या या महिलेने आपल्या कुटुंबीयांना हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. यानंतर पीडित महिलेच्या मुलीने अमेठी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. स्मृती इराणी या दौऱ्यावर असताना रडत रडत एक मुलगी त्यांच्याकडे आली आणि माझ्या आईसोबत दुष्कृत्य झालं आहे असं सांगू लागली. यानंतर स्मृती इराणींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.