सिंधुदुर्ग - कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन गुंडाळण्यावरून भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकासआघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. (BJP) एकीकडे स्वत:ला वाघ म्हणायचे आणि कोल्ह्यासारखे पळायचे, असा टोला नारायण राणे यांनी सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे. तसेच आज करण्यात आलेल्या १२ आमदारांच्या निलंबनावरूनही नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ("... So 12 BJP MLAs were suspended," Narayan Rane explained the exact reason)
राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. असे असताना राज्य सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन मुद्द्यापासून पळ काढत आहेत. अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जातो. मात्र त्यातूनही मुख्यमंत्र्यांनी पळ काढला. मुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नाही. त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
दरम्यान, आज विधानसभेत झालेल्या राड्यानंतर करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनावरही नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. सरकार वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केले आहे. मात्र असे असले तरी सत्ताधाऱ्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही नारायण राणे यांनी केला.
विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनामुळे एक लाख ३० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांनाही त्याचं गांभर्य नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री कॅबिनेटच्या बैठकीला जात नाहीत, पत्रकार परिषदा घेत नाहीत. विधिमंडळाचे अधिवेशनही अल्पकाळासाठी आयोजित केलं जात आहे. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा काय चालतो? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे.