नाशिक - जेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्यावेळी हे पुरोगामित्व टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक आघाडीवर राहिले. तसेच त्यांनी ही पुरोगामित्वाची चळवळ ब्राह्मणांनी टिकवली, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजातून येऊनही राजकारणात कसा टिकलो, त्याचे गुपितही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
देशस्थ ऋग्वेदी संस्था आयोजित ऋग्वेद सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला समाजाचा विचार बनावा लागेल. ज्या ज्या वेळी समाजासमोर आव्हाने येतील त्या त्या वेळी या आव्हानांचा सामना कसा करायचा याचा विचार करावा लागेल. देशाचा इतिहास पाहिल्यास, जेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्या वेळी ते पुरोगामित्व परत मिळवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक अग्रेसर झाले. त्यांनी पुरोगामित्वाची चळवळ देशात चालवली. ही एक ऐतिहासिक स्वरूपाची देणगी आपल्याला मिळाली आहे. ही घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे.यावेळी फडणवीस यांनी एक राजकीय किस्साही सांगितला. ते म्हणाले की, एकदा माझा एक मित्र म्हणाला की, हल्ली राजकारणात जातीपातीचं प्रस्थ खूप वाढले आहे. तुम्ही दोन टक्क्याचे ब्राह्मण मग तुम्ही कसे काय राजकारणात टिकणार. त्यावर मी म्हणालो की, अतिशय सोपं आहे. दोन टक्क्याच्या ब्राह्मणांनी जर ९८ टक्क्यांसोबत मिसळून गेले तर १०० टक्क्यांचे होतील. अशाच प्रकारे जर आपण समाजोपयोगी कामं केली तर लोकं डोक्यावर घेतात. पुढारीपण देतात. त्यामुळे समाजाच्या उपयोगी पडण्याचा विचार आपण केला पाहिजे.