मुंबई – महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीच राजकारण आहे, राज्यातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही हे वास्तव आहे आणि याची मला जाणीव आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. एका वेबिनारच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भविष्यात तुमचं राजकारण महाराष्ट्रात असणार का? या प्रश्नाच्या उत्तरानंही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
यावर सुप्रिया सुळे(NCP Supriya Sule) म्हणाल्या की, मी बारामतीतून निवडून आले त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्याने महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही. आपली ताकद वाढवण्यासाठी सगळेच काम करतात. मुख्यमंत्रिपद मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यात गैर वाटण्यासारखं काही नाही असं सूचक विधान त्यांनी केले आहे. त्याचसोबत कोणावरही वैयक्तिक टीका करू नका, महाविकास आघाडी सरकारवर टीका करा असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी भाजपाला(BJP) दिला आहे.
तसेच पवार कुटुंब म्हणजे पक्ष नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक पक्ष आहे. हे कुटुंब हा पक्ष वाढावा अशीच प्रत्येक नेत्याची इच्छा आहे. राज्याच्या स्थैर्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. यापूर्वी पुलोदचा प्रयोगही झाला होता. उत्तर प्रदेश, गुजरात वगळता इतर राज्यात सत्ता मिळवणं भाजपासाठी कठीण झालं होतं. मध्य प्रदेशातून फोडाफोडीचं राजकारण करून सरकार स्थापन केले. त्यामुळे जे स्वत:ला चाणक्य वैगेरे म्हणवून घेणारे त्यांचा फुगा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर फुटला आहे असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपाला लगावला.
बाबा शरद पवारांचा‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते
जेव्हा मी बारामती मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. एकतर माझे वडील शरद पवार(Sharad Pawar) आणि आई प्रतिभा हे खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. मी संसदेची पहिल्यांदा पायरी चढले ती पायरी चढण्याची भाग्य तुला लाभलं ही संधी बारामतीच्या लोकांमुळे मिळाली आहे. ज्यावेळी तू या बारामतीकरांना विसरशील तेव्हा त्यादिवशी तुला ती पायरी चढता येणार नाही असा सल्ला बाबांनी मला दिला होता ते मी कायम लक्षात ठेवते अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.