मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत लवकर तोडगा काढला नाही, तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला.
मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
याचबरोबर, मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल. त्यांची ताकद संपली असेल, असे राज्य सरकारला वाटत असेल, त्यामुळेच या आंदोलनाचा आवाज सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. मराठा समाजासोबत फक्त खेळवा-खेळवीचे राजकारण हे सरकार करत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
शशिकांत शिंदेंना 100 कोटींचीही किंमत नाहीराष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजपाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी 100 कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्पोट केला होता. या गौप्यस्फोटावरून प्रवीन दरेकर यांनी शशिकांत शिंदेंवर टीका केली. शशिकांत शिंदे यांना 100 कोटींचीही किंमत नाही. आमच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना तिथे किंमत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.