...तर 'त्या' बारमालकांना अद्याप अटक का नाही?, अनिल देशमुख प्रकरणी काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:01 PM2021-07-17T17:01:25+5:302021-07-17T17:03:46+5:30

Sachin Sawant : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी हा मोदी सरकारच्या राजकीय दबावतंत्राचा असून, या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदनाम व अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

... So why aren't those bar owners arrested yet ?, Congress leader Sachin Sawant question in Anil Deshmukh case | ...तर 'त्या' बारमालकांना अद्याप अटक का नाही?, अनिल देशमुख प्रकरणी काँग्रेसचा सवाल

...तर 'त्या' बारमालकांना अद्याप अटक का नाही?, अनिल देशमुख प्रकरणी काँग्रेसचा सवाल

googlenewsNext

मुंबई : बारमालकांकडून कथितरित्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना अटक का केली नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा छळ करण्यासाठी व विरोधी पक्षाच्या सरकारांना बदनाम करण्यासाठी केला जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीमार्फत सुरू असलेली चौकशी हा मोदी सरकारच्या राजकीय दबावतंत्राचा असून, या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदनाम व अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

याचबरोबर, राष्ट्रीय तपास यंत्रणांची कार्यपद्धती ही सुशांत सिंह प्रकरणात दिसून आली आहे, तशीच कार्यपद्धती या प्रकरणात इडीने अवलंबली आहे. खोटी माहिती माध्यमांमध्ये पसरवणे, अफवांचा प्रसार करणे. माध्यमातून आलेल्या खोट्या बातम्यांचे जाणीवपूर्वक खंडन वा समर्थन न करणे हे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिसून आले, तेच आता दिसत आहे, असे म्हणत सचिन सावंत यांनी ट्विट करून ईडीला चार प्रश्न विचारले आहेत. 

सचिन सावंत यांनी विचारलेले चार सवाल...

१) अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कंपनीच्या उरण येथील जमीनीची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत असून सदर जमीनीची किंमत ₹३०० कोटी आहे अशा काही माध्यमातून बातम्या आल्या होत्या. ईडीने सदर मालमत्ता जप्त करताना ही जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ २.६७ कोटी किंमतीची आहे असे जाहीर केले आहे. मग या वावड्यांना वेळीच ईडीने उत्तर का दिले नाही?

२) इडीने जप्त केलेल्या फ्लॅटची किंमत २००४ मध्ये दिली गेली तर तो फ्लॅट या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो? 

३) सचिन वाझेने बारमालकांडून ४.७० कोटी रूपये जमा करून अनिल देशमुख यांना दिल्याचा जबाब दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. याच वसुलीतून देशमुख कुटुंबाने काही मालमत्ता खरेदी केल्या, असे चित्र रंगवले जाते आहे. परंतु, ईडीने ताब्यात घेतलेली जमीन, फ्लॅट आदी मालमत्ता २००४ व २००५ मध्ये खरेदी झालेल्या आहेत. त्या मालमत्तांचा या प्रकरणाशी संबंध कसा जोडता येईल व ज्या बारमालकांनी पैसे दिले असे इडीला वाटते त्यांच्यावर कारवाई अद्याप का केली नाही?

४)  दरमहा १०० कोटी गोळा करण्याबाबत सचिन वाझेला दिलेल्या कथित आदेशाची तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना माहिती होती, तर त्याबाबत त्यांनी वेळीच कोणतीही कारवाई न केल्याबद्दल त्यांची चौकशी का होत नाही ?

Web Title: ... So why aren't those bar owners arrested yet ?, Congress leader Sachin Sawant question in Anil Deshmukh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.