सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी भाषण करताना काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या सोहळ्यावरून टीका केली होती. ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्या स्तंभाला त्यांनी सॅल्यूट केला, त्यावर कमळ कोरलेले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले होते. त्याचा समाचार नाना पटोले यांनी गुरुवारी घेतला. ज्या हाताने तुम्ही मुद्दे लिहिता, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या पंजाचा वापर करता तो आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, मग तुम्ही काय पंजा कापून टाकणार का? असा थेट सवाल पटोले यांनी केल्यानंतर विरोधी बाकावरून तीव्र भावना उमटल्या नसतील तर नवल...
कसले आले सोशल डिस्टन्सिंग...विधानसभेत एका सदस्याच्या बाजूला दुसऱ्या सदस्याने बसू नये म्हणून वेगळ्या पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी फुलीचे चिन्ह लावले आहे, तेथे कोणी बसू नये, असे अपेक्षित आहे. त्यामुळेच अनेक आमदारांना प्रेक्षक गॅलरीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, सभागृहात पहिल्या दिवसापासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास डावलले जात आहेत. एकमेकांच्या शेजारी, गळ्यात हात टाकूनही अनेक सदस्य गप्पा मारत बसलेले दिसतात. खाली बसलेले सदस्य एकमेकांच्या शेजारी बसलेले चालतात. मग आम्हाला का वरती बसवले? असा सवाल गॅलरीत बसलेले आमदार विचारत आहेत. सभागृहात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे असे पालन होत असेल तर आम्ही बाहेर काय सांगणार? असा प्रश्न गॅलरीत बसून वैतागलेल्या आमदाराने विचारला.
प्रणितीच्या मदतीला आले फडणवीसकाँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी, कुष्ठरोग्यांना केवळ मदत न करता त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करण्याची काही योजना आखणार का? असा प्रश्न विचारला होता. मात्र, ज्या विषयावर चर्चा चालू आहे, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न नाही, असे उत्तर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. मी विचारले काय आणि मंत्री उत्तर काय देत आहेत, असे प्रणिती शिंदे म्हणत होत्या. पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते. तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या मदतीला धावून आले. "प्रणिती शिंदे यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यावर सरकार कुष्ठरोग्यांसाठी राहण्याची काही वेगळी व्यवस्था करणार आहे का? याचे उत्तर दिले पाहिजे", असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर राज्यमंत्र्यांच्या मदतीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख धावून आले. फडणवीस यांची सूचना स्तुत्य आहे, सरकार त्या कल्पनेचा समावेश आराखड्यात करेल, असे उत्तर दिले.
आमदारांना लॅपटॉप दिले खरे पण ते चालत नाहीतआमदारांना लॅपटॉप दिले खरे पण ते चालत नाहीत. बॅटरीच चार्ज नाही, ते ठेवायला आम्हाला जागाच नाही, अशा अनेक तक्रारी विधानसभेत आमदारांनी केल्या. सध्या प्रेक्षक व अधिकाऱ्यांसाठीच्या गॅलरीचा वापर सदस्यांसाठी केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर आमदार गॅलरीतील खूर्चीवर बसतात. तेथे समोर टेबल नसतो. त्यामुळे शेजारच्या खूर्चीवर त्यांना लॅपटॉप ठेवावा लागतो. ही गोष्ट काही आमदारांनी सभागृहात बोलून दाखवली. पण ‘नोंद घेण्यात आली’ यापलिकडे त्यांना कोणतेही आश्वासन मिळाले नाही.