मुंबई : भाजपातर्फे सोशल मीडियावर सुरु असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे 'सोशल मीडिया वॉरियर्स' हाणून पाडतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने अभिजीत सपकाळ यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिका-यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ४८ जिल्हाध्यक्ष, २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ प्रदेश कार्यकारिणी सदस्य व १० कोअर कमिटी सदस्य आहेत.
२०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम सोशल मीडिया विभागाने अतिशय प्रभावीपणे केले. आगामी काळात पक्षाची ध्येय-धोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मेगा कार्यकारिणी करेल, असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा सारासार विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून या ४२८ पदाधिका-यांची निवड केली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करून सपकाळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.