Jitendra Awhad Wife Statement in Marathi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. ऋता आव्हाड यांनी एपीजे अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत ओसामा बिन लादेन समाजामुळे दहशतवादी बनला, असे म्हटले आहे.
मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अभिनेत्री स्वरा भास्कर, पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऋता आव्हाडही उपस्थित होत्या.
जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड काय म्हणाल्या?
या कार्यक्रमात बोलताना ऋता आव्हाड म्हणाल्या की, "ओसामा बिन लादेनचे आत्मचरित्र वाचा. जसे एपीजे अब्दुल कलाम कलाम साहेब बनले. तसाच ओसामा बिन लादेन दहशतवादी बनला. तो का बनला? जन्मता दहशतवादी नव्हता ना? त्याला समाजाने बनवले. तो चिडून दहशतवादी बनला."
ऋचा आव्हाडांच्या विधानावर भाजपाची टीका
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ऋता आव्हाड यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
"शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी सार्वजनिक कार्यक्रमात मुलांना सांगताहेत की, जसे एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र वाचले, तसे ओसामा बिन लादेनचे आत्मचरित्र वाचा आणि समजून घ्या. तो जन्मता दहशतवादी नव्हता. तो समाजामुळे दहशतवादी बनला. जितेंद्र आव्हाडांनी इशरत जहाँची बाजू घेतली. आता त्यांच्या कुटुंबातील लोक जगभरात दहशतवादी घोषित आहे, त्याचे कौतुक करताहेत", अशी टीका भाजपचे शहजाद पूनावाला यांनी केली.
"ही तीच मानसिकता आहे. अफजल परिस्थितीने पिचलेला, याकूब बिचारा, बरहान वाणी मुलगा. दहशतवादाला झाकणे ही स्वभाव बनला आहे", अशी टीकाही शहजाद पूनावालांनी केली आहे.