मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थान तसेच कार्यालये अशा मिळून दहा ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (CBI raid on Anil Deshmukh residence) एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचा सीबीआयने महाविकास आघाडीमधील एका मोठ्या नेत्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीबीआयने केलेल्या या संपूर्ण कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली आहे. ("Something's wrong,'' Sanjay Raut criticizes CBI, Central Government over raid on Anil Deshmukh's residence)
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, ‘’कुछ तो गडबड है. मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही. कुछ तो गडबड जरुर है, असे म्हणत संजय राऊत यांनी या संपूर्ण कारवाईवरच शंका घेतली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर आज सकाळपासून सुरू झालेले धाडसत्र अद्याप सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआरआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.
अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी सीबीआयनं १४ एप्रिलला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.