नवी दिल्ली – काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदासाठी सर्वसंमती बनवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या १९ डिसेंबर रोजी बोलवली आहे. सोनिया गांधींनी काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाही बैठकीसाठी बोलावलं आहे. अलीकडेच या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून स्थायी अध्यक्षासह संघटनात्मक निवडणुकीत घेऊन पक्षात बदल करण्याची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत सोनिया गांधी पक्षाच्या नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करणार आहेत. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, या भेटीत कमलनाथ यांनी सोनिया गांधींना सल्ला दिला होता की, स्वत: पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करावी, कारण हे सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि स्वत:चं राजकीय वजन असणारे नेतृत्व आहेत.
सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी शनिवारी होणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. ज्याला पक्षाच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे दुजोरा दिला आहे. अशातच सोनिया गांधींनी या बैठकीला पक्षात नाराज असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाही आमंत्रण देण्याची शक्यता आहे. ज्यांच्यासोबत सोनिया गांधी बैठक घेतील आणि त्यांची नाराजी दूर करून पक्षाला पुढील दिशा देण्याचा प्रयत्न करतील.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार होणार नाहीत असंही सांगितलं जात आहे. अशातच गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवलं जाईल, यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे सोनिया गांधींना अहमद पटेल यांच्यासारख्या निष्ठावान नेत्याची गरज आहे. जो पक्षातील वरिष्ठ नेते आणि युवा नेते यांच्यात समन्वयाची भूमिका निभावू शकेल.
सोनिया गांधी यांचे वय आणि आरोग्य लक्षात घेता नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणं गरजेचे आहे. राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींनी दुसऱ्यांदा पक्षाचे नेतृत्व स्वीकारलं होतं, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी या सक्रियपणे पक्षाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे पक्षाला पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हवा असं मत ज्येष्ठ नेते मांडत आहेत.