नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतुद करावी अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या कल्याण योजनांविषयी काँग्रेसची जी भूमिका आहे, त्याची राज्यात अंमलबजावणी व्हावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. अर्थसंकल्पात मागासवर्गीयांसाठी केलेली आर्थिक वित्तीय वर्षात त्यांच्यासाठीच खर्च करावा यासाठी कर्नाटकमध्ये काँगेस सत्तेत असताना कायदा केला होता. त्याचा तेथील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना फायदा होतो. तशीच पावले महाराष्ट्राने उचलावीत, असे सोनिया गांधी यांनी सुचविले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी यूपीए सरकारने ठाम निर्णय घेतले होते. तसेच निर्णय महाआघाडी सरकारनेही घ्यावेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांची भरती करावी. ही प्रक्रिया विशिष्ट मुदतीत पूर्ण केली जावी अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. कौशल्यविकास घडवाअनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये कौशल्यविकास घडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तत्काळ पावले उचलावीत. या वर्गासाठी असलेली वसतिगृहे, आश्रमशाळा या ठिकाणी उत्तम सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; दिला महत्त्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 1:54 AM