- पोपट पवार बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा दक्षिण कर्नाटकचा प्रांत यंदा कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार याची उत्सुकता आहे. दक्षिण कर्नाटकात वोक्कालिगा समाजाबरोबरच लिंगायतांचेही प्राबल्य आहे. या दोन्ही समाजांचा लंबक ज्याच्याकडे झुकेल, त्याच पक्षाला दक्षिण कर्नाटकात विजयाची पताका फडकविता येणार आहे. दक्षिण कर्नाटकातील १४ जागांवर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी, १८ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही दक्षिण कर्नाटकातील अनेक लोकसभा मतदारसंघांत प्रचाराची राळ उडवून दिल्याने येथील सर्वच जागांवरती चुरशीच्या लढती होणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण कर्नाटकातील १४ जागांपैकी सहा जागांवर भाजपने विजय मिळविला होता, तर काँग्रेसनेही सहा जागा पटकाविल्या होत्या. जनता दलाने स्वतंत्रपणे लढून दोन जागा मिळविल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत जनता दल व काँग्रेसची आघाडी असल्याने मतविभाजन टळणार आहे. परिणामी, काँग्रेसला दक्षिण कर्नाटकात अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.दक्षिण कर्नाटकातील १४ जागांपैकी बंगणुरू उत्तरमधून भाजपने माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना रिंगणात उतरविले आहे. गौडा यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राज्याचे पाणीपुरवठामंत्री कृष्णा बायेर गौडा यांनाच उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे चिकबळ्ळारपूरमधून माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसने बच्चेगौडा यांचे आव्हान आहे.बंगलोर दक्षिणमध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारून भाजपने तेजस्वी सूर्या या तरुण नेत्याला उमेदवारीदिली आहे. या मतदारसंघात वोक्कालिगा आणि ब्राह्मण समाजाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे.
निवडणुकीत दक्षिण कर्नाटक काँग्रेसबरोबर की भाजपबरोबर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:39 IST